'लाभार्थ्यांना त्रास झाल्यास अधिकाऱ्यांची गय नाही'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

कोल्हापूर - ""संजय गांधी निराधार योजना गरजूंपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कोणत्याही शासकीय कार्यालयात कसलीही अडचणी आल्यास संबंधितांनी संपर्क साधवा, आम्ही मदत करण्यास सदैव तत्पर आहोत; मात्र लाभार्थ्यांना अधिकाऱ्यांनी कागदपत्रे देण्यास हेतूपुरस्सर टाळाटाळ केल्यास त्यांचीही गय केली जाणार नाही. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना झालाच पाहिजे'', असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. 

संजय गांधी निराधार योजना समिती कोल्हापूर शहरतर्फे आज शाहू स्मारक भवनात मेळावा झाला. अपंग, विधवा, वृद्ध अशा 46 जणांना मंजूरी पत्रे तर 50 घरेलू मोलकरणींना ओळखपत्रांचे वाटप आमदार श्री. क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. 

संजय गांधी निराधार योजनेतील एजंटगिरी, बेकायदेशीर गोष्टी नष्ट करण्यात येतील. पात्र लाभार्थींना वंचित ठेवणार नाही, असा निर्धार मेळाव्यात करण्यात आला. दिग्विजय कालेकर, अशोक लोहार, तेजस्विनी पाटील, शैलजा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. 

आमदार श्री. क्षीरसागर यांनी क्षीरसागर फौंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध वैद्यकीय उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, ""वैद्यकीय मदत हवी असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही तुम्हाला ही मदत तत्काळ उपलब्ध करुन देऊ.'' 
समितीचे अध्यक्ष किशोर घाटगे म्हणाले, ""या योजनेचा लाभ घ्यावयाचा म्हटला तर लाभार्थ्यांना विविध कागदपत्रे गोळा करण्यासाठी सहा महिन्यांचा तरी कालावधी लागतो. उत्पन्नाचा दाखला मिळविताना अडचण उभी राहते. अशावेळी तहसीलदारांनी संबंधितांना मदत करावी. विशेष बाब म्हणून तहसीलदारांनी कागदपत्रे मंजूर करुन द्यावीत. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, या अपप्रवृवीत नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातील. वंचित लोकांनीही समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा. तसेच पात्र लाभार्थींनी अन्य लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून ही योजना शहरासह ग्रामीण भागातही प्रभावीपणे जाऊन पोहोचेल.''  सागर घोरपडे यांनी सुत्रसंचालन केले. तेजस्विनी घोरपडे यांनी आभार मानले.

Web Title: Sanjay Gandhi Niradhar Yojana