धनंजय महाडिक यांच्यावर वेब सीरिज होईल ! - मंडलिक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

गोकुळ मल्टिस्टेटवेळी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात एकेठिकाणी प्रा. मंडलिक यांनी, महाडिकांना हद्दपार करा, अशी घोषणा केली होती. यावर महाडिकांना हद्दपार करायला निघालेले मंडलिक अगोदर शुद्धीवर तर असायला हवेत, असा टोला खासदार महाडिक यांनी लावला होता.

कोल्हापूर - मी किती वाजता उठतो, काय करतो, कुठे जातो यावर महाडिकांनी चर्चा करू नये. मी त्यांच्या शेजारीच राहतो. सकाळी सहा वाजता येथील मैदानात फिरायला जातो. दिवसभर मतदारसंघातील गावांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करतो. मात्र, खासदार धनंजय महाडिक हे काय करतात, यावर बोलायला लागलो तर एक वेब सीरिज प्रसिद्ध करावी लागेल, असा पलटवार मंगळवारी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केला.  

गोकुळ मल्टिस्टेटवेळी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात एकेठिकाणी प्रा. मंडलिक यांनी, महाडिकांना हद्दपार करा, अशी घोषणा केली होती. यावर महाडिकांना हद्दपार करायला निघालेले मंडलिक अगोदर शुद्धीवर तर असायला हवेत, असा टोला खासदार महाडिक यांनी लावला होता. महाडिक यांच्या या वक्‍तव्यावर आज मंडलिक यांनी आपली तिखट प्रतिक्रिया दिली. 

ते म्हणाले, खासदार महाडिकांनी काल बेताल आरोप केले. त्यांच्याच पक्षाचे लोक आता त्यांना विरोध करत आहेत. त्यामुळे त्यांना वैफल्य आले आहे. यातूनच ते घाणेरडे आरोप करत आहेत. 

पराभव दिसल्याने महाडिकांचे बेताल वक्तव्य - मेंडके
मुरगूड : उपऱ्या महाडिकांची धंदेवाईक राजकारणाची परंपरा जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. पराभव समोर दिसू लागल्याने ते बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यांना जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात मुरगूडचे उपनगराध्यक्ष नामदेव मेंडके यांनी पत्रकार परिषदेत केला. 

Web Title: Sanjay Mandlik comment