कोल्हापुरातून प्रा. मंडलिक; हातकणंगलेतून धैर्यशील माने

कोल्हापुरातून प्रा. मंडलिक; हातकणंगलेतून धैर्यशील माने

कोल्हापूर - जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्हीही जागा शिवसेनेकडेच राहतील, त्यात कोणत्याही स्थितीत बदल केला जाणार नाही, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या आमदार, प्रमुख पदाधिकारी व उमेदवारांच्या बैठकीत स्पष्ट केले. कोल्हापुरातून प्रा. संजय मंडलिक तर हातकणंगलेतून धैर्यशील माने यांची उमेदवारीही श्री. ठाकरे यांनी जाहीर केली. प्रा. मंडलिक यांच्या विजयाची जबाबदारी आमदार राजेश क्षीरसागर व चंद्रदीप नरके यांच्यावर असेल, असेही श्री. ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. या पार्श्‍वभूमीवर श्री. ठाकरे यांनी आज सचिव अनिल देसाई, मंत्री दीपक सावंत, आमदार राजेश क्षीरसागर, सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबीटकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील-सरूडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, संभाव्य उमेदवार प्रा. मंडलिक व श्री. माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेला गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागा वाढवून मिळाली आहे. यापुढे उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानणार नाही, तर सर्वच मंत्रिपदे समान वाटली जातील. हातकणंगलेची जागाही सोडण्याचा प्रश्‍नच नाही, असेही ते म्हणाले. पुढच्या वेळी येताना पुढे घेऊन या, असे श्री. ठाकरे हे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना उद्देशून म्हणाले.

कोल्हापूरच्या जागेबाबत काही आमदारांनी प्रश्‍न विचारले असता ही जागा कदापिही सोडणार नाही. या मतदारसंघातून प्रा. मंडलिक हेच उमेदवार असतील. तुम्ही नियोजन करा आणि मला कधी यायचे ते सांगा; पण दोन्हीही जागा जिंकल्याच पाहिजेत, असा दमही त्यांनी भरला. श्री. ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे उलटसुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

होय, महाडिकही भेटले
गेल्या आठवड्यात उमेदवारीबाबत खासदार धनंजय महाडिक आपल्याला भेटल्याचेही श्री. ठाकरे यांनी बैठकीत सांगितले; पण त्यांना आपण आता बदल होणार नसल्याचे सांगितले आहे, असेही ते म्हणाले.

नरके, क्षीरसागरांवर जबाबदारी
आमची मदत प्रा. मंडलिक यांना नको का, असा सवाल काही दिवसांपूर्वी आमदार क्षीरसागर यांनी पक्षाच्या बैठकीत उपस्थित केला होता. या पार्श्‍वभूमीवर मंडलिक यांच्या विजयाची जबाबदारी त्यांच्यासह आमदार नरके यांच्यावर राहील, असे श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शेट्टी आमचे नव्हे भाजपचे मित्र
हातकणंगलेत खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचा पाठिंबा मिळावा म्हणून भेट घेतली होती. युतीत ही जागा आम्हाला सोडा असा त्यांचा आग्रह होता; पण श्री. शेट्टी हे सेनेचे नव्हेत तर भाजपचे मित्र आहेत, त्यामुळे ही जागा सेनेकडेच असेल, असे श्री. ठाकरे म्हणाले. 

सुरेश साळोखे सेनेत यायला तयार
पक्षाचे माजी आमदार सुरेश साळोखे हे पुन्हा शिवसेनेत यायला तयार आहेत, त्यांच्यासह आणखी काही जण पक्षात यायला उत्सुक असल्याची माहिती या बैठकीत स्थानिक नेत्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com