हिंमत असेल तर इलेक्‍शनला उभे राहा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

काल आमच्यापासून बाजूला गेलेले लोक आमच्यावर बेताल आरोप करत आहेत. असली नाटकं आम्हालापण करायला येतात. हिंमत असेल तर इलेक्‍शनला उभे राहा, असे खुले आव्हान खासदार संजय पाटील यांनी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना दिले. 

सांगली  - काल आमच्यापासून बाजूला गेलेले लोक आमच्यावर बेताल आरोप करत आहेत. असली नाटकं आम्हालापण करायला येतात. हिंमत असेल तर इलेक्‍शनला उभे राहा, असे खुले आव्हान खासदार संजय पाटील यांनी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना दिले. 

मिरज येथे निवडणुकीसंदर्भात झालेल्या एका कार्यक्रमात संजयकाका आणि गोपीचंद एका व्यासपीठावर होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते एकदिलाने लढले होते. आता त्यांच्यात जोरदार संघर्ष पेटला आहे. मिरजेत त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. गोपीचंद यांनी भाजपच्या धोरणांवर, आरक्षणावर आणि जिल्ह्यातील नेत्यांच्या भूमिकेवर हल्लाबोल केला. त्यावेळी जिल्ह्यातील पालकमंत्री का मिळाला नाही, हा मुद्दा चर्चेत आला. त्याला उत्तर देताना गोपीचंद यांनी जिल्ह्यातील नेत्यांनीच जिल्ह्यातील पालकमंत्री होऊ दिला नाही, असा आरोप करत संजयकाकांना खोपरखळी हाणली. त्यावर चिडलेल्या संजयकाकांनी ‘एखादा माणूस पालकमंत्री व्हायचा रोखत असेल तर तो मोठाच म्हटला पाहिजे’, असा टोला लगावला. त्याचवेळी या दोन्ही नेत्यांत बाचाबाची झाली. 

संजयकाकांनी ‘गेल्या काळात सिंचनासह अनेक प्रश्‍न सोडवण्यासाठी ताकद लावली आहे. काही लोकांनी डोळ्यावर पट्टीच बांधली असेल तर त्यांना ते कसे दिसणार?’ अशी टोलेबाजी केली. त्यांना रोखत गोपीचंद यांनी ‘तुम्ही निवडून आला त्यावेळी आम्ही तुमच्या सोबतच होतो. आम्हीच तुम्हाला निवडून आणले आहे’, याची आठवण करून दिली. संजयकाकांचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी ‘काल आमच्यापासून बाजूलला गेलेली लोकं आमच्यावर बेताल आरोप करत आहेत. असली नाटकं आम्हाला पण करायला येतात. हिंमत असेल तर इलेक्‍शनला उभा रहा’, अशी शब्दांत गोपीचंद यांना आव्हान दिले. गोपीचंद यांच्या नावाची चर्चा लोकसभेसाठी होते आहेच, आता ते खासदार संजयकाकांचे आव्हान स्वीकारणार का, हे पहावे लागेल.

Web Title: Sanjay Patil comment