संजय राऊत मातोश्रीशी गद्दारी करणारा माणूस...खातात मातोश्रीचे अन गोडवे गोविंदबागचे : आमदार गोपीचंद पडळकर यांचा जशास तसे उत्तर देण्याचा इशारा 

घनश्‍याम नवाथे
Friday, 18 December 2020

सांगली-  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी "सामना' तून केलेल्या टीकेला भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले. राऊत हे मातोश्रीचे खाऊन गोविंदबागचे गोडवे गातात. मातोश्रीशी गद्दारी करणारा हा माणूस आहे. त्यामुळे यापुढे मला अडवण्याचा प्रयत्न कराल तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा आमदार पडळकर यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला. 

सांगली-  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी "सामना' तून केलेल्या टीकेला भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले. राऊत हे मातोश्रीचे खाऊन गोविंदबागचे गोडवे गातात. मातोश्रीशी गद्दारी करणारा हा माणूस आहे. त्यामुळे यापुढे मला अडवण्याचा प्रयत्न कराल तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा आमदार पडळकर यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला. 

ते म्हणाले, ""धनगर समाजाचे आरक्षण, भटक्‍या विमुक्तांचे काही प्रश्‍न, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर मी ढोल वाजवण्याचे आंदोलन केले. त्यासाठी मला संजय राऊत, शिवसेना किंवा सरकारची परवानगी घेण्याची मला गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने मला तो अधिकार दिला आहे. त्यामुळे मी एकवेळा नाही तर हजारवेळा ढोल विधानभवनाच्यासमोर वाजवणार आहे. त्यामुळे राऊत यांच्यामध्ये धमक असेल तर त्यांनी मला अडवून दाखवावे. मी ढोल वाजवायची वेळ का आली. सरकार येऊन एक वर्ष झाले. मग राऊत यांनी आमची दु:खे का मांडली नाहीत. आमच्या आरक्षणाच्या बाबतीत लेखनी का चालली नाही. भटके-विमुक्त आणि ओबीसींच्या प्रश्‍नांवर का लिखाण करत नाहीत. उठसूट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची. मोदींच्यामुळे तुम्ही खासदार झालात, आणि त्यांच्यावरच टीका करता. म्हणून मी आज त्यांना पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत.'' 

ते पुढे म्हणाले, ""राऊत नेहमी विरोधकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. मलाही त्यांना बोलघेवडा, दलाल म्हणता येते. परंतू माझी ती संस्कृती नाही. आरक्षणाच्या मागणीवर मी आंदोलन केले तर तुरूंगात टाकण्याची भाषा राऊत करतात. परंतू त्यांना माहीत नाही, मी समाजाच्या प्रश्‍नांवर अनेकवेळा तुरूंगात जाऊन आलोय. तिथल्या सतरंजी झोपून भत्ता देखील खाल्ला आहे. त्यामुळे समाजाच्या मागणीसाठी मला तुरूंगात टाकले तरी मला फिकीर नाही. राऊत हे मातोश्रीचे खाऊन गोविंदबागचे गोडवे गातात हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. मातोश्रीशी गद्दारी करणारा हा माणूस आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा करणारा आणि विचार बुडवणारा हा माणूस आहे. त्यांची बुद्धी केवळ विकृत लिखाणासाठीच चालते. खरेतर त्यांनी लिखाणातून न्याय मिळवून देणे अपेक्षित आहे. यापुढे जर त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut is a man who betrayed Matoshri. MLA Gopichand Padalkar's hint to answer in the same way