संजयकाकाना रोखायला गोपीचंद, ही निव्वळ अफवा !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

संजयकाकांना काऊंटर करण्यासाठी तुम्हाला ही संधी दिली गेल्याचे बोलले जातेय, त्यावर मत काय? या प्रश्‍नावर त्यांनी भूमिका मांडली.

सांगली ः खासदार संजयकाका पाटील यांना राजकारणात चेकमेट देण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची आमदारकी दिली, अशी जोरदार चर्चा रंगते आहे. संजयकाका आणि गोपीचंद यांच्यातील लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच्या संघर्षाची त्याला किनार आहे, मात्र या साऱ्या चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे सांगत गोपीचंद पडळकर यांनी लवकरच मी आणि काका एकत्र बसू, असे आज येथे स्पष्ट केले.

आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सांगली शहरात आलेल्या गोपीचंद यांनी येथील जिल्हा परिषदेतील कोरोना वॉर रुमला भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. "मला राज्यसभेवर खासदार करण्याबाबत भाजपमध्ये हालचाली सुरु होत्या, मात्र विधान परिषदेवर आमदार झालो, ही मोठी संधी असून लोकांसाठी काम करायचे आहे', असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या मुद्यावर "दिल्लीत संजयकाकांसोबत काम करण्याची संधी हुकली असे वाटत नाही का?' या प्रश्‍नावर गोपीचंद यांनी मास्कआडून हसत दुर्लक्ष केले.

त्यावर संजयकाकांना काऊंटर करण्यासाठी तुम्हाला ही संधी दिली गेल्याचे बोलले जातेय, त्यावर मत काय? या प्रश्‍नावर त्यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, ""संजयकाका पाटील हे लोकसभेचे खासदार आहेत. ते चांगले काम करत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांची धडपड आहे. मलाही जिल्ह्यासाठी काम करायचे आहे. त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात संघर्ष होणार नाही. मी अजून त्यांना भेटलेलो नाही, मात्र लवकरच त्यांची भेट होईल.''

लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या संघर्षात संजयकाका समर्थकांनी गोपीचंद पडळकर यांना "तासगाव येऊन दाखवा', असे आव्हान दिले होते. त्यावर गोपीचंद यांनी तासगावमध्ये जावून टपरीवर चहा घेतला होता. ""आता तुम्ही आणि संजयकाका तासगावात एकत्र चहा घेणार काय?'' या प्रश्‍नावर गोपीचंद यांनी ""तुम्हालाही बोलावतो'', असे सांगताच हशा पिकला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjaykaka and gopichand padalkar politics