बॅटरी, बल्ब भाड्याने देऊन संतोषने साधली प्रगती 

Santosh achieve success after selling batteries LED lights
Santosh achieve success after selling batteries LED lights

सोलापूर : नोकरी नाही म्हणून निराश न होता जुळे सोलापुरात राहणाऱ्या संतोष कटारे या तरुणाने भाजी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांवर चार्जिंग बॅटरी आणि एलईडी बल्ब भाड्याने देण्याच्या व्यवसायातून प्रगती साधली आहे. आयटीआय शिक्षण झालेल्या संतोषने आपल्या कौशल्य विकासातून बेरोजगार तरुणांना प्रेरणा दिली आहे. 
संतोषचा हा व्यवसाय 365 दिवस सुटी न घेता चालू असतो. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता संतोष आपल्या ग्राहकांना सेवा देत असतो. संतोषने 15 वर्षांपूर्वी इलेक्‍ट्रॉनिक वस्तू दुरुस्तीचे दुकान चालू केले. तो घरोघरी जाऊन ट्यूबलाइट, पंखा, मिक्‍सर आणि इतर इलेक्‍ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती करायचा. पुढे मग टीव्ही, डीव्हीडी, सीडी प्लेअर दुरुस्तीची कामेही मोठ्या प्रमाणात यायला लागली. कालांतराने हा व्यवसाय कमी झाला. मग संतोषने मोबाईल रिचार्ज, मोबाईल दुरुस्ती, मोबाईल ऍक्‍सेसरीज विक्रीचा व्यवसाय सुरू केला. 

अतिक्रमण हटविल्याने संतोषला आपले दुकान बंद करावे लागले. मग त्याने रस्त्याच्या कडेला टेबल-खुर्ची टाकून आपला व्यवसाय केला. संतोषचे वडील जिल्हा परिषद शिक्षक होते. त्यांनी मुलाला प्रामाणिकपणे कष्ट करून जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन दिले. दरम्यानच्या काळात संतोषला एक मित्र भेटला. तो मित्र भाजीपाला विकायचा. सायंकाळी त्याला अंधारात भाजीविक्री करावी लागायची. तो सहज म्हणाला "मला सायंकाळी बॅटरी आणि लाइट भाड्याने देतो का?' त्यावेळी संतोषने बॅटरी आणि एलईडी बल्बचा सेट तयार करून मित्राला भाड्याने दिला. भाजी विक्रेत्या मित्राकडील सुविधा पाहून अन्य लोकही संतोषकडून बॅटरी आणि बल्ब भाड्याने मागू लागले. हळूहळू संतोषचे ग्राहक वाढू लागले. त्याप्रमाणे कामही वाढले. संतोषने या व्यवसायात गुंतवणूक वाढवली. आता त्याच्या दुकानात शेकडो चार्जिंग बॅटऱ्या आणि एलईडी बल्ब आहेत. चहाची टपरी, पानपट्टी, वडापाव, भजी विक्रेते, भाजीवाले, पाणीपुरी, भेळगाडी, फूलविक्रेते यासह रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाडीवाल्यांची दुकाने प्रकाशमान करण्याचे काम संतोष करत आहे. 

दिवसभर बॅटरी चार्जिंग केली जाते. सायंकाळी दुचाकीवरून 20 ते 25 किलोमीटर फिरून दुकानदारांना चार्जिंग केलेली बॅटरी देऊन त्यांच्याकडून जुनी बॅटरी घेतो. कधी कधी अचानक बॅटरी बंद पडल्याचा कॉल येतो आणि मग तिथे जाऊन पर्यायी बॅटरी द्यावी लागते. एकेदिवशी शॉर्टसर्किटने माझ्याकडील सर्व चार्जर बॅटरी जळाल्या. सर्वकाही होत्याच नव्हतं झालं. तरीसुद्धा मी निराश झालो नाही. मित्र आणि कुटुंबीयांच्या मदतीने पुन्हा नवीन बॅटऱ्या आणल्या, पण सेवेत खंड पडू दिला नाही. 
- संतोष कटारे, तरुण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com