ज्योतीला माफीचा साक्षीदार करू नये 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

सातारा - संतोष पोळ विरुद्ध सबळ पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, ज्योती मांढरेला दोषारोपपत्रांमध्ये सहआरोपी करण्यात आले नाही, ती विश्‍वासू नाही. त्यामुळे तिला माफीचा साक्षीदार करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद संतोष पोळच्या वकिलांनी आज न्यायालयात केला. 

सातारा - संतोष पोळ विरुद्ध सबळ पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, ज्योती मांढरेला दोषारोपपत्रांमध्ये सहआरोपी करण्यात आले नाही, ती विश्‍वासू नाही. त्यामुळे तिला माफीचा साक्षीदार करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद संतोष पोळच्या वकिलांनी आज न्यायालयात केला. 

वाई-धोम येथे संतोष पोळ याने केलेल्या खून सत्राचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्यासमोर सुरू आहे. यामध्ये संतोष पोळची साथीदार ज्योती मांढरे हिला माफीचा साक्षीदार करू नये, यासाठी पोळच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मागील तारखेला युक्तिवाद केला होता. आज संशयिताच्या वतीने ऍड. हुटगीकर यांनी युक्तिवाद केला. 

मुख्य आरोपीबाबत पुरावा नसेल तर सहआरोपीला माफीचा साक्षीदार करता येते. मात्र, आरोपपत्रामध्ये पोळ विरुद्ध सबळ व भक्‍कम पुरावे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे ज्योतीला माफीचा साक्षीदार करण्याचे कारण नाही. केवळ सहआरोपीलाच माफीचा साक्षीदार करता येते. मात्र, पोळच्या आरोपपत्रामध्ये ज्योतीला कुठेही सहआरोपी म्हटलेले नाही. माफीचा साक्षीदार हा विश्‍वासपात्र लागतो. मात्र, ज्योतीवर खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधिकाऱ्यांवरही तिने गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे तिला माफीचा साक्षीदार करू नये, असा युक्तिवाद ऍड. हुटगीकर यांनी केला. 

या वेळी जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी उपस्थित होते. संतोष पोळ व ज्योती मांढरे यांनाही न्यायालयात आणण्यात आले होते. संशयिताच्या वतीने युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खटल्याची पुढील सुनावणी दोन मार्चला ठेवली. या वेळी माफीच्या साक्षीदाराबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: santosh pol santosh