PHOTOS : शेतकऱ्यांनो, घर बांधताय मग 'हा' पहा आराखडा

सुधाकर काशीद
शनिवार, 14 डिसेंबर 2019

देशातील १७० आर्किटेक्‍ट यात सहभागी झाले होते. शेतकरी कितीही प्रगत झाला तरी त्याच्या दारात अंगण, पडवी, बसण्यासाठी कट्टे, हवेशीर गोठा याबरोबरच निवांत हवेशीर खोल्या अशा अंगाने श्री. रामाणे यांनी या घराची रचना केली.

कोल्हापूर - शेतकऱ्याचे घर बदलत्या काळात कसे असावे, शेतकऱ्याच्या गरजा, त्याला घरात मिळणारा काही तासाचा तरी निवांतपणा याचा आर्किटेक्‍चर अंगाने विचार करून घराचा आराखडा कसा असावा यासाठी घेतलेल्या स्पर्धेत कोल्हापूरचे आर्किटेक्‍ट संतोष रामाणे यांच्या रचनेला पहिला क्रमांक मिळाला.

देशातील १७० आर्किटेक्‍ट यात सहभागी झाले होते. शेतकरी कितीही प्रगत झाला तरी त्याच्या दारात अंगण, पडवी, बसण्यासाठी कट्टे, हवेशीर गोठा याबरोबरच निवांत हवेशीर खोल्या अशा अंगाने श्री. रामाणे यांनी या घराची रचना केली.  याच स्पर्धेत डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरंगच्या (आर्किटेक्‍ट) विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला. पुण्यात झालेल्या किसान प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘होम फॉर फार्मर’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. व त्यासाठी देशभरातून आर्किटेक्‍टनी आपल्या रचना सादर केल्या होत्या. 

असे असावे शेतकऱ्याचे घर

रामाणे यांनी प्रत्यक्षात शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचे घर, त्याची बैल, म्हैशी, शेळी, शेतीची अवजारे, धान्य बियाणाचा साठा याचा प्राधान्याने विचार करून या घराची रचना केली. मात्र, हे करताना शेतकऱ्याच्या जीवनात कट्ट्यावर निवांत बसण्याचा क्षण त्याचे कष्ट विसरण्यासाठी कसा आधार ठरतो यावर त्यांनी रचनेत भर दिला. त्यामुळे या घराला बंगल्याचे स्वरूप न देता त्याला घराचा रेखीवपणा येऊ शकला. 

शेतकऱ्याचे पारंपरिक पण परिपूर्ण घर

या रचनेसंदर्भात रामाणे यांनी सांगितले, शेतकऱ्याचे घर ही एक खूप चांगली पारंपरिक संकल्पना आहे. जरूर ते घर भौतिकदृष्ट्या देखणे नसेल; पण ते घर त्याच्या सर्व गरजा पूर्ण करणारे असते. शेतकऱ्याला जरूर त्याच घरात पिढ्यानपिढ्या रहावे लावणेही योग्य नाही. तोही चांगल्या घरात राहिला पाहिजे; पण यातून खेडेगावातही घराऐवजी बंगले उभे राहू लागले आहेत. मात्र, शेतकरी कुटुंबाची गरज व प्रत्यक्षात बंगला याचे समीकरण जुळु शकत नाहीत. त्यामुळे मी शेतकऱ्याचे पारंपरिक पण परिपूर्ण घर अशी संकल्पना राबविली. या संकल्पनेत शेतकरी ज्या भागात राहतो तिथल्या वातावरणाचा विचार केला गेला.

गोबरगॅस, गोठा असावा तरी कोठे ?

ग्रामीण भागात घरासाठी शहराच्या तुलनेत एैसपैस जागा असते म्हणून घराचा आकार ९०० ते ११०० चौरस फुटापर्यंत ठेवला. घर कौलारूच दिसावे असे त्याला स्वरूप दिले. दरवाजातच विस्तीर्ण ओसरी व कट्टा ठेवला. घराला अंगणासाठी जागा ठेवली. कारण शेतकऱ्याच्या घरात अनेक कौटुंबिक कार्यक्रम असतात. धान्य वाळत घालावे लागते. यासाठी हे अंगण उपयोगी पडते. घराच्या कट्ट्यावर बसून शेतकऱ्यांच्या तब्येतीच्या, पिकपाण्याच्या, गावातील घडामोडींच्या गप्पांना कट्ट्यामुळेच बहार येतो. त्यामुे पार किंवा कट्टावरच्या गप्पा हा शेतकऱ्याच्या जीवनातील एक मनमोकळेपणाचा क्षण असतो. त्याचा विचार करून घराला एैसपैस कट्टा तयार केला. जनावराच्या गोठ्यातील शेण व मलमुत्राचा वास कमी जाणवावा म्हणून गोठ्याची जागा एका कोपऱ्यात तसेच गोबर गॅस प्लॅंट व घरातील संडास बाथरूमची जागाही त्याच कोपऱ्यात ठेवली. 

भुकंपरोधक, पुरातही टिकाऊ घर

शेतकऱ्याचे घर म्हणजे घराच्या बैठकीच्या खोलीतही पोती, दोरखंड, पाण्याची पाईप, बियाणाच्या पिशव्या दिसल्याच पाहिजेत असे काही नाही; पण साधारण जागा मिळेल तेथे हे साहित्य शेतकरी ठेवतो.या नव्या रचनेच्या घरात दिवाणखाणा नैसर्गिक प्रकाश व वारे याने भरून जाणारा ठेवला आहे. जेणेकरून त्यातून शेतकऱ्याची सुबत्ताही जाणवावी, असा प्रयत्न केला आहे. आणि घर पूर्णपणे भुकंपरोधक व पावसाळ्यात पुराच्या पाण्याच्या विळख्यात सापडले तरी त्याच्या ढाच्याला काही बाधा पोचणार नाही, असे तंत्र वापरले आहे.

रेम्डअर्थमुळे घरबांधणीच्या खर्चात बचत शक्य

घर बांधकामासाठी माती, वाळू, पाणी याच्या रॅम्डअर्थचा वापर केला आहे. स्थानिक मजूरच या घराचे पूर्ण बांधकाम करू शकतील असे तंत्र आहे. रेम्डअर्थमुळे घरबांधणीच्या खर्चात बचत होणे शक्‍य आहे. 
- संतोष रामाणे, आर्किटेक्‍ट
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Santosh Ramane House Planning For Farmers First In Country