पंढरपुरात संतपीठ उभारण्यासाठी सुमारे 25 कोटीहून अधिक खर्च

अभय जोशी 
गुरुवार, 16 मे 2019

भीमा नदीवर होणार आणखी एक नवीन पूल......
भीमा नदीच्या पैलतीरावरील शेगाव दुमाला ते गोपाळपुर स्मशानभूमी जवळील पत्राशेड यादरम्यान 18 मीटर रुंदीचा आणखी एक नवीन पूल बांधण्यात येणार आहे. 

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले हे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी मंदिर समिती आणि पर्यटन विकास महामंडळात करार केला जाणार असून संतपीठाचे उभारण्यासाठी सुमारे 25 कोटीहून अधिक खर्च होणार आहे. या कामाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आज सकाळशी बोलताना दिली.

ढोबळे म्हणाले पर्यटन विकास महामंडळाचे सध्या भक्तनिवास जिथे आहे तिथे संतपीठ उभारण्याचा प्रस्ताव आहे समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले हे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. त्या संदर्भातील करार होताच संत पिठाच्या उभारणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे. संतपीठ कसे असावे याविषयी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि अन्य तज्ञ मंडळींची चर्चा सुरू आहे.

भीमा नदीवर होणार आणखी एक नवीन पूल......
भीमा नदीच्या पैलतीरावरील शेगाव दुमाला ते गोपाळपुर स्मशानभूमी जवळील पत्राशेड यादरम्यान 18 मीटर रुंदीचा आणखी एक नवीन पूल बांधण्यात येणार आहे. 

आज पुणे येथे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले  यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुलासाठी आवश्यक असलेले भूसंपादनाचे काम तसेच आषाढी यात्रेच्या दृष्टीने करावयाची कामे वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत अशी माहिती श्री ढोले यांनी दिली.

फुल उभारणी तसेच त्याला जोडणाऱ्या रस्त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. शेगाव दुमाला येथे पाच कोटी 89 लाख, कोर्टी बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी सुमारे 10 कोटी रुपये आणि प्रत्यक्ष पूल उभारण्यासाठी सुमारे 25 कोटी रुपये असा खर्च अपेक्षित आहे. नदीच्या  पैलतीरावरील 65 एकर जागेत यात्रा काळात लाखो वारकरी मुक्कामास असतात. त्यांना पंढरपूर शहरात न येता नवीन होणाऱ्या पुलावरून गोपाळपूर रस्त्यावरील दर्शन रांगेकडे थेट जाता येईल.

मराठवाड्या कडून सांगोला, मंगळवेढा, सांगली, कोल्हापूर कडे जाणारी वाहने सध्या पंढरपूर शहरातून जातात.ती वाहने देखील पंढरपूर शहरात न येता नवीन प्रस्तावित पुलावरून जातील. जड वाहने शहरात येऊ नयेत यासाठी रिंगरोड तयार करण्यात येत आहे. त्यानुसार कोर्टी आणि वाखरी रस्ता जोडणारा नवीन रस्ता तयार करण्यात येत आहे. वाखरी ते शिरढोण ते शेगाव दुमाला असा रस्ता देखील प्रस्तावित करण्यात आला आहे असे ढोले यांनी नमूद केले.

Web Title: santpeeth in Pandharpur