हरोली सरपंचांचा निर्घृण खून 

हरोली सरपंचांचा निर्घृण खून 

कवठेमहांकाळ - पूर्ववैमनस्यातून राग मनात धरत हरोली (ता. कवठेमहांकाळ) चे सरपंच आणि शिवसेना नेते युवराज बाळासाहेब पाटील (वय 47) यांचा काल मध्यरात्री निर्घृण खून झाला. दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या घराजवळच कुऱ्हाड, कोयत्याने त्यांच्या डोक्‍यात, मानेवर, पाठीवर आणि चेहऱ्यावर खोलवर वार केले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांचे युवराज बंधू होत. खुनानंतर आज हरोली पंचक्रोशीसह कवठेमहांकाळमध्ये बंद पाळण्यात आला. 

दरम्यान, पोलिसांनी काही तासात खुनाचा छडा लावला. संशयित रमेश आप्पा खोत, राजेंद्र विठोबा खोत, हणमंत विठोबा टोणे (सर्व पिंपळवाडी, ता. कवठेमहांकाळ) यांना अटक केली. तिघांनी खुनाची कबुली दिली आहे. तिघांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांच्या पोलिस कोठडीचा आदेश झाला. गतवर्षी अर्जुन बाळकृष्ण आटपाडकर याच्या खुनानंतर संशयित रमेश खोत आणि मृत युवराज यांच्यात वैमनस्य वाढले होते. त्यातूनच खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः काही महिन्यांपूर्वी सरपंच युवराज पाटील यांचा चालक सूर्यकांत शंकर यादव आणि संशयित आरोपी रमेश खोत याचा भाचा अमर ऊर्फ संतोष जयराम आटपाडकर यांच्यात वादावादी झाली होती. वादातून मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याबद्दल यादवने अमरविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर यादव आणि अमर यांच्यातील वाद विकोपाला गेला. 

अमर आटपाडकरला जीवे मारण्याची सुपारी अर्जुन आटपाडकर (थबडेवाडी) याला दिली असावी, असा संशय रमेशला होता. त्यामुळे अर्जुनने मारण्यापूर्वीच थबडेवाडी चौकात त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी रमेश, भाचा अमर आणि दोन साथीदारांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अर्जुनच्या खुनानंतर सरपंच युवराज आणि रमेश खोत यांच्यातील वैमनस्य वाढतच गेले. 

काल रात्री सरपंच युवराज यांनी हरोलीतील घरातून रात्री टीव्हीवरील क्रिकेटचा सामना पाहिला. त्यानंतर रात्री साडेबारा वाजता मोटार (एमएच 12 ईक्‍यू 2056) मधून गावापासून दीड किलोमीटरवर असलेल्या घराकडे निघाले. मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास घराजवळ मोटार लावली. त्यानंतर ते घरी जात असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांना गाठले. तिघांनी मागून कुऱ्हाड व कोयत्याने डोक्‍यात, मानेवर, पाठीवर गंभीर वार केले. युवराज यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्रीवेळी घरातील सर्वजण झोपी गेल्याने कोणाला प्रकार लक्षात आला नाही. पहाटे युवराजच्या आई घराबाहेर आल्या; तेव्हा युवराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड करून शेजारील विजय पाटील यांना बोलावले. 

कवठेमहांकाळ पोलिसांना माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी आले. मृत युवराज यांचे नातेवाईक, ग्रामस्थ आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घटनास्थळी आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात नेला. अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे, उपाधीक्षक नागनाथ वाकुडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांना तपासाचे आदेश दिला. अवघ्या सहा तासांत रमेश खोत, राजेंद्र खोत, हणमंत टोणे यांना अटक केली. 

हरोली परिसरात श्रद्धांजली 
सरपंच युवराज पाटील यांच्या खुनानंतर कवठेमहांकाळसह देशिंग, बनेवाडी, हरोली येथे गावे बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. खुनाची माहिती मिळताच सांगली, मिरजेतून शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हरोली येथे मोठ्या संख्येने जमले होते. 

भक्कम पुरावे जमा करणार 
पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले, ""मृत युवराज पाटील यांचा खून पूर्ववैमनस्यातून झाला आहे. तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची कसून चौकशी केली जाईल. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी तपासली जाईल. भक्कम पुरावे गोळा करून दोषारोपपत्र दाखल केले जाईल. संशयितांवर आणखी कडक कारवाई करता येईल, याचाही तपास केला जाईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com