सरपंचांनी स्वखर्चातून काढला गाळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

बिजवडी - जाधववाडी (ता. माण) येथे दीडशे वर्षांपूर्वी दोन आड बांधले होते. मात्र, त्यानंतरच्या काळात ते आड गाळ व कचऱ्याने बुजून गेले होते. सरपंच ऋतुजा विकास निंबाळकर यांनी या आडातील गाळ काढून त्यातील पाणी वापरण्यायोग्य करण्याचा संकल्प केला होता. त्याला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिल्याने गाळ काढून आड स्वच्छ करण्यात आले.

जाधववाडीत जलसंधारणाची चांगली कामे झाली असून सीसीटी, डीप सीसीटी, नालाबांध, ओढे, नाले, तलाव, बंधारे खोलीकरण-रुंदीकरणाची कामे लोकसहभागातून करण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गावातील पुरातन दोन आड स्वच्छ करण्याचे सरपंच ऋतुजा निंबाळकर यांनी ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी स्वखर्चातून ४५ हजार रुपये खर्च करून दोन्ही आड गाळमुक्त स्वच्छ करून घेतले. आडातील गाळ काढण्यासाठी सरपंचांना त्यांचे पती विकास निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य राघू जाधव, सुरेश मदने, रामचंद्र निंबाळकर, हणमंत जाधव, भालचंद्र नलवडे आदींनी सहकार्य केले आहे.

दोन्ही आड प्रत्येकी ३६ फुटांचे असून एकातून २० फूट, तर दुसऱ्यातून १६ फूट गाळ व कचरा काढण्यात आला. आता हे दोन्ही आड स्वच्छ झाले असून त्यात थोडे फार पाणी येत आहे. पावसाळ्यात या दोन्ही आडात भरपूर पाणी येणार आहे. भविष्यात त्या आडात पाणीही सोडता येणार आहे. त्यातील एकाचा गावातील ग्रामस्थांना इतर कामांसाठी पाणी व झाडांना पाणी देण्यासाठी, तर दुसऱ्या आडावर जुन्या रितीप्रमाणे रहाट बसवला जाणार आहे. 

गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी विश्वास दाखवत गावची सेवा करण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करत प्रसंगी पदरमोड करून ग्रामस्थांचा विश्वास सार्थकी लावण्याचा प्रयत्न करणार आहे.
- ऋतुजा निंबाळकर, सरपंच, जाधववाडी 

Web Title: sarpanch well mud motivation