सरसंघचालक भागवत यांची जिल्हा संघचालक शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट 

चंद्रकांत देवकते
शुक्रवार, 13 जुलै 2018

कामती खुर्द येथे संघाचे जिल्हा संघचालक शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. याठिकाणी भागवत यांनी संघाच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीची स्वतंत्र बैठक घेऊन सद्यस्थितीची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. 

मोहोळ जि. सोलापूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ता. 10 ला मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे संघाचे जिल्हा संघचालक शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. याठिकाणी भागवत यांनी संघाच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीची स्वतंत्र बैठक घेऊन सद्यस्थितीची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. 

सरसंघचालक मोहन भागवत यांचे कामती खुर्द येथे ठीक सायंकाळी सहा वाजता आगमन झाले. यावेळी प्रमुख राजकीय नेते वा अन्य कोणत्याही प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताला जसे भव्य दिव्य स्वागत, फटाक्यांची आतिषबाजी असा कुठल्याही प्रकारचा बडेजाव नव्हता. भागवत यांना झेड प्लस संरक्षण असल्याने एस टी स्टँड ते जिल्हा संघचालक पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भागवत यांचे आगमन झाल्यानंतर ते थेट पाटील यांच्या घरी गेले. तेथे भागवत यांनी प्रथम संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. त्यानंतर मोहोळ तालुका कार्यकारिणीची बैठक घेतली. या दोन्ही बैठकी दरम्यान संघाची दैनंदिन शाखाही येथेच घेण्यात आली. यावेळी सुमारे एक तासभराचे नियमित कार्यक्रम संपन्न झाले.  

भागवत हे या बैठकीसाठी प्रथमच कामती खुर्द सारख्या लहान गावात येत असल्याने त्यांना पाहण्यासाठी परिसरातील संघप्रेमी व अन्य नागरिक कामती येथे आले होते. मात्र कडक बंदोबस्त असल्याने त्यांची निराशा झाली.

दरम्यान बैठक स्थळी संघाच्या कार्यकारिणी सदस्या शिवाय कुणालाही प्रवेश नसल्याने याठिकाणी झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली, सरसंघचालक भागवत यांनी काय सांगितले, काय मार्गदर्शन केले याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान भागवत यांनी पाटील यांच्या घरी रात्री 9 वाजता जेवण घेतले. यावेळी भागवत यांनी जिल्हा संघचालक पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर रात्री 9:30 वाजता ते सोलापूर कडे मार्गस्थ झाले.  

यावेळी बैठकीत जिल्हा संघचालक शिवाजी पाटील, जिल्हा कार्यवाह निलेश भंडारी, जिल्हा सह कार्यवाह मदन मोरे, किरण सुतार, मोहोळ तालुका कार्यवाह अॅड. अमोल देशपांडे, सह कार्यवाह दिपक तरंगे, डॉ. जयंत गोळवलकर, डॉ. अमोल हराळे, दिलीप वाघमोडे, पोपटराव कडबने, बाळासाहेब कडबने, गणेश शिंदे, विकास देशपांडे, मंगेश सोवनी, मनोज गुरव, पांडुरंग पाटील, पद्माकर कोळेकर यांच्यासह कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत लोकांचा कानोसा घेतला असता यापूर्वी सुमारे 30 ते 40 वर्षापूर्वी तात्कालीन सरसंघचालक मोहोळला येऊन गेल्याची माहिती मिळाली. कर्नाटकातील एका नियमित कार्यक्रमासाठी सरसंघचालक जात असताना त्यांनी नियोजीत भेटीचा कार्यक्रम आखुन संघटनात्मक बाबीसह इतर वर्तमान परिस्थितीचाही कानोसा घेतला असल्याची चर्चा जनसामान्यात आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Sarsanghachalak Bhagwat visited the residence of District sanghachalak Shivajirao Patil