सरूडमध्ये अखेर बाटली आडवी

डी. आर. पाटील
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

सरूड - आज येथे दारूबंदीसाठी झालेल्या मतदानात २४३२ पैकी १७६८ महिलांनी मताचा अधिकार बजावला. यांपैकी १६०३  महिलांनी आडव्या बाटलीच्या बाजूने कौल दिला तर केवळ ९३ मते उभ्या बाटलीच्या बाजूला पडली.७२ मते बाद ठरली. यानंतर मिरवणुकीद्वारे महिलांनी आनंदोत्सव साजरा केला.

सरूड - आज येथे दारूबंदीसाठी झालेल्या मतदानात २४३२ पैकी १७६८ महिलांनी मताचा अधिकार बजावला. यांपैकी १६०३  महिलांनी आडव्या बाटलीच्या बाजूने कौल दिला तर केवळ ९३ मते उभ्या बाटलीच्या बाजूला पडली.७२ मते बाद ठरली. यानंतर मिरवणुकीद्वारे महिलांनी आनंदोत्सव साजरा केला.

येथील प्राथमिक मराठी शाळेत सकाळी ८ वाजता मतदानास सुरवात झाली. सकाळपासूनच महिला मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दुपारी १२.३० पर्यंतच १५०० महिलांनी मतदान केले होते. तर दुपारी तीनलाच मतदान पूर्ण झाल्याने सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली होती. पाचपर्यंत मतदानाची वेळ असतानाही महिलांत दारूबंदीबाबत मोठी ईर्षा असल्याने वेळेअगोदरच मतदान मोठ्या प्रमाणात झाले. ७२.६९ टक्के एवढे मतदान झाले.

गावात दोन देशी दारूची दुकाने, एक बीअर बार व तीन बीअर शॉपीची दुकाने आहेत. महामार्गालगत ५०० मीटर अंतरावरच्या नियमात बसत नसल्याने सरूड अपवाद ठरले होते. साहजिकच गावाबरोबर बाहेर गावातल्या तळिरामांचे सरूड हे जणू माहेरघरच बनले होते. 

या सर्वाला त्रासूनच गावातील महिलांनी दारूबंदीसाठी एकत्र येऊन रणशिंग फुकले होते. २ जूनला आमदार सत्यजित पाटील यांच्या पुढाकारातून महिलांनी दारूबंदीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. याची पडताळणी उत्पादन शुल्क खात्याने ३० जूनला केली.

दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून दारूबंदी विरोधी प्रचाराचे रान महिलांनीच पुढाकार घेऊन पेटवले होते. विद्यार्थिनींबरोबर आबालवृद्ध महिलांनी कोपरा सभा घेऊन बाटली आडवी करण्यासाठी कंबर कसली होती. आज तीन मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होते. सायंकाळी सहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय जाधव, उपनिरीक्षक सचिन भवड यांच्यासह सहा तर पोलिस उपनिरीक्षक पी. एच. येम्मेवार यांच्यासह दहा कर्मचारी बंदोबस्तासाठी होते.

आज दिवसभरातील मतदानाच्या घडामोडीवर माजी आमदार बाबासाहेब पाटील (सरूडकर), आमदार सत्यजित पाटील, ‘गोकुळ’ च्या  संचालिका अनुराधा पाटील, प्राजक्ता पाटील, प्रितम पाटील, माजी जि. प. सदस्या मंगलताई पाटील, राजकुंवर पाटील, सरपंच मीना घोलप, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख अलका भालेकर, सुनीता आपटे, सीमा भालेकर, सुगंधा काळे आदी लक्ष ठेवून होते.

महिलांनी ऐतिहासिक लढ्याद्वारे गावात बाटली आडवी करून एकीचे बळ दाखवून दिले आहे. भावी पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यामागे या महिलांचे योगदान राहणार आहे. म्हणूनच समस्त महिलांचा व बाटली आडवी करण्यासाठी योगदान दिलेल्या प्रत्येक नागरिकांचा मी आभारी आहे.
- सत्यजित पाटील, आमदार

Web Title: sarud news wine ban in sarud