बदली प्रक्रियेने शिक्षकांचे बिघडले स्वास्थ

बदली प्रक्रियेने शिक्षकांचे बिघडले स्वास्थ

शाळांतील गुणवत्ता मंदावण्याची भीती; मुख्य प्रक्रिया कधी सुरू होईल?

सातारा - नवीन बदली धोरणाच्या रखडलेल्या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक- शिक्षिका चार महिन्यांपासून दबावाखाली आहेत. यामुळे शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होण्याची शक्‍यता आहे. ग्रामविकास विभागाचा धोरण रेटण्याचा कार्यक्रम सुरू असल्याने सरकारला गुणवत्तावाढीपेक्षा शिक्षकांच्या बदल्यांमध्ये जास्त रस असल्याची टीका होऊ लागली आहे. 

शिक्षकांच्या बदल्या दर वर्षीच होतात. यावर्षी भाजप सरकारने विशेषतः ग्रामविकास विभागाने आखलेल्या धोरणाने शिक्षण क्षेत्रच ढवळून निघाले आहे. या बदल्यांना टक्केवारी नसल्याने जिल्ह्यातील आठ हजार ४७९ पैकी सुमारे सहा हजार शिक्षकांवर बदलीची वेळ येण्याची दाट चिन्हे आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ शिक्षकाने कमी नोकरी झालेल्या शिक्षकांना खो देत बदली मागायची आहे. आजवर विद्यार्थ्यांचा खो-खो घेणाऱ्या शिक्षकांनाच या सरकारने खो- खो खेळण्यास भाग पाडले आहे. मात्र, या खो- खो पद्धतीला मर्यादा नसल्याने बदलीपात्र संपेपर्यंत हा खेळ सुरूच राहणार आहे. 

ऑनलाइन बदल्याने पारदर्शकता येत आहे; परंतु त्यासाठीची सुसज्ज यंत्रणा ग्रामविकास विभागाने विकसित केली नसल्याने मेपासून माहिती भरण्याचा खेळ सुरू आहे. अद्याप संवर्ग दोनमधील शिक्षकांची माहिती भरण्याचे काम सुरू झाले नाही. मग, संवर्ग तीन, त्यानंतर बदली अधिकार प्राप्त आणि बदलीपात्र शिक्षकांच्या माहिती कधी भरून होणार, या मुद्दा आहेच. सातत्याने नवनवीन शुद्धिपत्रके निघत असल्याने शिक्षण विभागही त्रस्त झाला आहे.

शिक्षण विभागाकडे शाळा व्यवस्थापन व गुणवत्तेचे काम आहे. मात्र, शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या बदल्या अधिकार मात्र ग्रामविकास खात्याकडे असल्याने या बदलीप्रक्रियेत शिक्षणमंत्री, शिक्षण विभागही हतबल आहे. 
शिक्षकांच्या आधीच जास्त संघटना असताना ग्रामविकासच्या धोरणामुळे त्यांची शक्‍कलेच पडली आहेत. ज्याला हा अध्यादेश सोयीस्कर आहे, त्यांची संघटना जन्माला आली, तर ज्यांना सोय करून घ्यायची आहे, त्यांनीही संघटना जन्माला घातल्या. या धोरणांमुळे भविष्यात शिक्षक संघटनाही मोडीत निघतील, अशी भीतीही संघटनांच्या नेत्यांना वाटू लागली आहे. 

अनेक संघटना, काही शिक्षकांनी एकजूट करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. काहींनी बदली नको, तर काहींनी बदली हवी म्हणून याचिका दाखल केल्या. त्याचा परिणाम म्हणजे न्यायालयाने शासनाला बदल्यांची परवानगी दिली; पण यंत्रणा अपुरी व सदोष असल्याने जुलै महिना संपत आला, तरी संवर्ग दोन या वर्गात मोडणाऱ्या शिक्षकांचे अर्ज भरले गेलेत. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण होणार कधी व बदलीची मुख्य प्रक्रिया कधी सुरू होईल, या प्रश्‍नांची उत्तरे कोणाकडेच नाही. शिक्षकांच्या डोक्‍यावर सोय-गैरसोयीची टांगती तलवार लटकत असल्याने त्यांचे स्वास्थ्य बिघडले आहे. 

पती- पत्नी नोकरीत असल्यास त्यांना ३० किलोमीटरच्या आतील गावांमध्ये नेमणूक द्यावी, या मुद्द्यावर एकल शिक्षकांनी आक्षेप घेतला. त्यांची राज्यभरात स्वतंत्र संघटना स्थापन झाल्याने ‘दुकल’नेही एकी केली. त्यामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या शाळेत आपल्याला राहायचेच नाही. कुठे फेकले जाऊ, याचा भरवसा नाही. या विचाराने सध्या वरकरणी दिसत नसले, तरी शिक्षणातील गुणवत्तेची गती मंदावली आहे. गुणवत्तापूर्ण शाळेतील बहुतांश शिक्षक बाहेर पडल्यास त्या शाळेचे ‘वाळवंट’ होईल, अशीही स्थिती आहे.

२० टक्‍के शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांसाठी शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा केला जात आहे. बदल्या होणार असल्याने शिक्षकांचे कामात लक्ष नाही. बदलून येणाऱ्यांना माहिती नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. गुणवत्तेची धोरणे शिक्षण विभाग, आस्थापना धोरणे ग्रामविकास विभाग राबवत आहे, ही विसंगती आहे.
- विठ्ठल माने,  माजी अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक बॅंक.

खो- खो पद्धतीच्या बदल्यांनी जिल्ह्यातील सुमारे सहा हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्यास त्याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर होणार आहे. बदली होऊ जाणे एका मिनिटाचे आहे; परंतु उभे करणे खूप अवघड असते. चांगल्या प्रकारे शाळा विकसित केलेल्या शिक्षकांवर हा अन्याय होईल, तसेच त्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळेल.
- दीपक भुजबळ, अध्यक्ष, अखिल सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ.

शिक्षक संघटनांचे म्हणणे...
२० टक्‍के शाळांवरील बदल्यांसाठी हा खेळखंडोबा
जिल्ह्यांतर्गतऐवजी तालुक्यांतर्गत बदल्या कराव्यात
नोकरी देणारी झेडपी, तर बदलीही तिनेच करावी
महिला, ज्येष्ठ शिक्षक घेतील स्वेच्छानिवृत्ती
शासनाची भूमिका दबावाची
बदली प्रक्रियेबाबत मंत्र्यांची उत्तरे समाधानापुरती
गुणवत्ता वाढण्यासाठी प्रशासकीय कामे थांबवा
चार वर्षे होत नसल्याने पदोन्नती कराव्यात
मुख्याध्यापक, शिक्षक भरती प्रक्रिया राबवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com