नांगरे पाटीलसाहेब ... साताऱ्यात असचं चालतं...

श्रीकांत कात्रे 
रविवार, 12 मार्च 2017

ऐतिहासिक सातारा शहरातील अतिक्रमणालाही इतिहास आहे. करणाऱ्यांनी अतिक्रमण करायचे, प्रशासनाने हटविण्याच्या घोषणा करायच्या, घोषणा होताच तात्पुरती मोहीम राबवायची, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा अतिक्रमण आणखी वीतभर वाढवित पुढे सरकत राहयचे. अधिकारी आणि नेतेमंडळींनी डोळेझाक करायची. लोकांना चालण्यासाठीच्या उद्दात हेतूने पालिकेने फुटपाथ बांधायचे. फुटपाथवर खोकी, गाडे आणि पक्की दुकानेही. लोक रस्त्यावर. पालिका किंवा संबंधित शासकीय विभागांपेक्षा अतिक्रमणधारकांना संरक्षण देणारे दादा वेगळेच. रस्ते शासनाचे. अतिक्रमण करून वापरणारे कष्टकरी वेगळे. या कष्टकऱ्यांना पिळणारे कष्ट न करता दादागिरीवर जगणारे नामानिराळे.

ऐतिहासिक सातारा शहरातील अतिक्रमणालाही इतिहास आहे. करणाऱ्यांनी अतिक्रमण करायचे, प्रशासनाने हटविण्याच्या घोषणा करायच्या, घोषणा होताच तात्पुरती मोहीम राबवायची, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा अतिक्रमण आणखी वीतभर वाढवित पुढे सरकत राहयचे. अधिकारी आणि नेतेमंडळींनी डोळेझाक करायची. लोकांना चालण्यासाठीच्या उद्दात हेतूने पालिकेने फुटपाथ बांधायचे. फुटपाथवर खोकी, गाडे आणि पक्की दुकानेही. लोक रस्त्यावर. पालिका किंवा संबंधित शासकीय विभागांपेक्षा अतिक्रमणधारकांना संरक्षण देणारे दादा वेगळेच. रस्ते शासनाचे. अतिक्रमण करून वापरणारे कष्टकरी वेगळे. या कष्टकऱ्यांना पिळणारे कष्ट न करता दादागिरीवर जगणारे नामानिराळे. त्यांच्यावर कोणाचाच अंकुश नाही. अधिकारी व नेतेमंडळींचे मौन दादांच्या पथ्यावर पडणारे.  

वर्षानुवर्षे याच इतिहासाची पुनरावृत्ती होते. फुटपाथ असून, नसला म्हणून काय झाले सहनशील जनता रस्त्यावरून चालते. रस्त्यातच आडव्यातिडव्या उभ्या असणाऱ्या रिक्षा, वडापच्या जिपा व इतर वाहनांतून कसरत करीत जीव मुठीत धरून लोक चालत राहतात. अधिकारी व नेतेमंडळीही आपल्या वाहनांतून या रस्त्यांवरून जात असतात. ही अतिक्रमणे, त्याचा लोकांना होणारा त्रास, वाहतुकीला होणारा अडथळा, रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांमुळे होणारे छोटे अपघात हे सारे त्यांच्या डोळ्यांना दिसत नाही. हे सारे व्यवस्थित सुरू असताना विश्‍वास नांगरे पाटील नामक वरिष्ठ पोलिस अधिकारी येतो. त्यांना हे रस्त्यावरील चित्र दिसते. ते डोळस असल्यामुळे ही अतिक्रमणे हटवून फूटपाथ मोकळे करण्याची ऑर्डर पोलिस विभागाला देतात. तत्पर पोलिस लगेच कार्यवाही सुरू करतात. नांगरे पाटील जिल्ह्यात असेपर्यंत फूटपाथवरील काही साहित्य हटविले जात असल्याचे चित्र निर्माण केले जाते. विद्रूप झालेले चित्र आता काही तरी बदलेल, लोक रहदारीच्या रस्त्यांवरून चालण्याऐवजी फूटपाथवरून चालतील, अशी स्वप्नंही पडायला सुरवात झाली; पण नांगरे पाटील यांना साताऱ्याचा इतिहास माहिती नसावा. जिल्ह्यातून त्यांचे पाऊल बाहेर पडायचा अवकाश, की फूटपाथ पूर्वी होते, त्यापेक्षा अधिक व्यापून गेले. पोलिस फक्त पावत्या फाडायला रस्त्यावर पुन्हा सज्ज ठाकले. खोकी, टपऱ्या, फूटपाथवरील व्यापाराने पुन्हा जोर धरला. दादांचा भाव पुन्हा वधारला. अधिकारी व नेतेमंडळी पुन्हा डोळे झाकूनच रस्त्यावरून जाऊ लागली. 

नांगरे पाटील यांच्या डोळ्यांना काय खुपले होते, कोण जाणे. खरे तर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, पालिकेचे मुख्याधिकारी अशा अधिकाऱ्यांसह जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या सर्वच विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या डोळ्यांना रोजच असे चित्र दिसत असले, तरी त्यांना काहीच चुकीचे वाटत नाही. ‘हे असचं चालायचं,’ म्हणून रस्त्यावरून सर्कस करीत चालण्याची सवय लोकांनाही अंगवळणी पडत होती. नांगरे पाटील यांना काही खटकले म्हणून काय झाले? ते येणार दोन दिवसांपुरते. काहीही ऑर्डर सोडणार. म्हणून काय एखाद्या शहराचा इतिहास बदलायचा काय?

अधिकारी वर्गाची ही भावना महत्त्वाची आहे. बरं, त्यांनी ऑर्डर केली ती पोलिसांना. शहरातील अतिक्रमण, रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था, लोकांचे जगणे हे काय फक्‍त पोलिसांनीच पाहायचे असते का? महसूल, सार्वजनिक बांधकाम, उपप्रादेशिक परिवहन, नगरपालिका अशा इतर विभागांचीही तेवढीच जबाबदारी असते. हे नांगरे पाटील यांना माहिती नसावे. त्यामुळे ‘त्यांनी पोलिसांना सांगितले, पोलिस बघतील,’ असे म्हणून बाकीच्यांनी ‘आहे तैसे राहवे!’ अशी भूमिका घेत शांत राहणे पसंत केले आणि हे खरंच आहे, की या सर्व विभागांना त्यांच्या त्यांच्या विभागाची एवढी कामे पडलेली असतात, त्यांना या आणखी वेगळ्या प्रश्‍नात लक्ष घालण्यासाठी वेळ तरी कुठे असतो? या सर्व विभागांचा समन्वय साधला तरच हा प्रश्‍न सुटू शकतो, हे माहिती असले तरी त्यांना डोळेझाक करावी लागते. अतिक्रमण करणारे संघटित आहेत. त्यांना पुनर्वसनासाठी जागा दिली, तरी फूटपाथसारखी जागा सहजासहजी मिळत नाही. त्यांच्या पोटावर पाय कशाला द्यायचा, म्हणून दयाळू वृत्तीने डोळेझाक करावी लागते. त्याशिवाय अधिकाऱ्यांनी लक्ष दिले तर ‘दादा’ लोकांच्या कुटुंबाचे काय होणार, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न कोण सोडविणार, असा उदात्त हेतूही आहेच. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत बऱ्याच गोष्टी येत असल्या तरी त्यांना फक्त शहराकडे लक्ष देऊन कसे चालेल? जिल्ह्यातील इतर मोठ्या कामांकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. अनेक कामांची टेंडरे निघत असतात. ती प्रक्रिया वेळेत पूर्ण नाही झाली तर अनेक ठेकेदारांचे हाल होतील. पालिकेचे अधिकारी तर नेतेमंडळींवर अवलंबून असतात. त्यांना योग्य सूचना मिळाल्याशिवाय ते काही निर्णय घेऊ शकत नाहीत. 

हो... म्हणूनच... म्हणूनच विश्‍वास नांगरे पाटील... तुमचे थोडे चुकतेयच. एखाद्या शहराचा इतिहास माहीत नसताना एखादी गोष्ट तुम्हाला दिसली आणि मनाला खटकली तर लगेच काही तरी ऑर्डर द्यायची, हे काही तरी भलतेच. तुमचे ऐकायला ही काही मुंबई नाही. इथे काही २६- ११ चा हल्ला होणार नाही. शांत, संयमी, सुसंस्कृत शहरात येऊन तुम्ही काहीही सांगता. अहो, इथली लोकं वर्षानुवर्षे अशीच रस्त्यावरून चालताहेत. सध्याही चालताहेत. पुढेही चालत राहतील. आपले डोळे चांगले आहेत, म्हणून इतरांच्या कार्यक्षेत्रात नाक कशाला खुपसता. इथले नेतेमंडळी समर्थ आहेत. इथले अधिकारी कर्तव्यदक्ष आहेत. तुम्ही उगाचच काळजी करता. जाऊ द्या... पुन्हा या एखाददिवशी. या पाहुण्यासारखे राहवा, पाहुण्यासारखे जावा. ... 
हा सातारा आहे. इथ असचं चालतं.

Web Title: satara condition