सातारा पालिकेत सातारा विकास आघाडीची दहशत ; विरोधकांचा आरोप व सभात्याग

सिद्धार्थ लाटकर
मंगळवार, 10 एप्रिल 2018

गेल्या सहा महिन्यांत सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या कारभाराचा विरोधी नगरविकास आघाडीने दुसऱ्यांदा सभात्याग करुन निषेध व्यक्त केला. 

सातारा : सर्वसाधारण सभेतील विषयपत्रिकेवरील सविस्तर टिपण्या मिळत नाहीत. विरोधी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर नगराध्यक्षा उडवाउडवीची उत्तरे देतात. सभागृहात विरोधकांची मुस्कटदाबी होत आहे. दहशत, गुंडगिरी, गळचेपी होत असल्याचा आरोप करत विरोधी नगरविकास आघाडी आणि भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान गेल्या सहा महिन्यांत सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या कारभाराचा विरोधी नगरविकास आघाडीने दुसऱ्यांदा सभात्याग करुन निषेध व्यक्त केला. 

सातारा पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा होती. सभेपूढे एकूण 25 विषय होते. विषयपत्रिकेवरील विषयांच्या वाचन होण्यापूर्वी भाजपचे आशा पंडित, सिद्धी पवार आणि विजय काटवटे या सदस्यांनी सत्ताधारी त्यांनी सूचविलेली कामे करीत नाहीत. विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये भाजप सदस्यांना विश्‍वासात घेतले जात नाही असे आरोप केले. या आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी केला. ते देत असलेले स्पष्टीकरण काटवटे अधूनमधून खोडून काढत होते. यामुळे अन्य सत्ताधारी सदस्य काटवटे यांच्या बोलणे रोखत होते. काटवटेंना नगरविकास आघाडीच्या (नविआ) सदस्यांची साथ मिळू लागल्याने सभागृहात गोंधळ वाढला. एकवेळ तर नविआ आणि भाजपच्या सदस्यांच्या टीका टिपणीवर सत्ताधाऱ्यांची फौजच उत्तर देण्यास उठली. अखेरीस विरोधीपक्ष नेते अशोक मोने यांनी सत्ताधारी आघाडीच काळभेर उघड पडल आणि विरोधकांनी बाके वाजविली. 

दरम्यान, मोने यांनी सत्ताधारी विरोधकांची मुस्कटदाबी करीत आहेत. दहशत, गुंडगिरी, गळचेपी होत असल्याचा आरोप करत सभात्याग करीत असल्याचे जाहीर केले. सर्व विरोधी सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी काही मिनिटांतच 25 पैकी 22 विषय मंजूर केले. 

Web Title: Satara Corporation Satara Vikas Aaghadi Fear Opposition