जिल्ह्यास २३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

सातारा - राज्यात तब्बल १३ कोटी वृक्षलागवड करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यासाठी त्यापैकी २३ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभागाने तयारी केली असून, आजवर ५२ लाख रोपे उपलब्ध केली आहेत. 

सातारा - राज्यात तब्बल १३ कोटी वृक्षलागवड करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यासाठी त्यापैकी २३ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभागाने तयारी केली असून, आजवर ५२ लाख रोपे उपलब्ध केली आहेत. 

राज्य सरकारकडून एक ते ३१ जुलै या कालावधीत वन महोत्सव साजरा केला जात असतो. त्यामध्ये जिल्ह्यांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात वन विभागास १३ लाख २५ हजार, सामाजिक वनीकरण विभागास पाच लाख, ग्रामपंचायतींना तीन लाख ७५ हजार, इतर  विभागांना एक लाख असे विभागून उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभागातर्फे १०७ जागांवर, सामाजिक वनीकरण विभागामार्फत १२९, तर ग्रामपंचायतींतर्फे ८६० ठिकाणांवर वृक्षारोपण केले जाणार आहे. जिल्ह्यात एकूण तीन हजार पाच हेक्‍टर व दोन हजार ७३७ किलोमीटर अंतर परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यासाठी २२ लाख १९ हजार खड्डे खोदण्यात आले आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली. 

स्थानिक रोपे रोपवाटिकांत
वन, सामाजिक वनीकरण व कृषी विभागांमार्फत ४६ रोपवाटिका केल्या आहेत. त्यामध्ये प्राधान्याने स्थानिक प्रजातींची रोपे असून, त्यात शिसू, खेर, लिंब, करंज, बांबू, बोर, जांभूळ, आवळा, बाभूळ, वावळा, सीताफळ, बेल, आपटा, चिंच, कवठ, शिवण, बहावा, आंबा, वड, पिंपळ, उंबर, हिवर, पळस आदी रोपांचा समावेश आहे. 

गतवर्षीची आठ लाख रोपे जगली
गेल्या वर्षी जिल्ह्यास सात लाख ६३ हजार ३०० रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट असतानाही आठ लाख ८८ हजार ६९ रोपे (११६.३५ टक्‍के) लावण्यात आली होती. त्यापैकी सात लाख ९४ हजार २८० म्हणजेच ८९.४४ टक्‍के रोपे जगल्याचा दावा वन विभागाने केला आहे. 

Web Title: Satara district 23 million tree goal of plantation