साताऱ्याला मिळणार तीन खासदार व नऊ आमदार! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर जय-पराजयाच्या चर्चांबरोबर साताऱ्यात आता राज्यसभा आणि विधान परिषदेच्या गप्पाही रंगू लागल्या आहेत. साताऱ्याला आता तीन खासदार व नऊ आमदार मिळणार या पोस्टनी सोशल मीडियाचा अवकाशही व्यापला जात आहे.

सातारा : विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर जय-पराजयाच्या चर्चांबरोबर साताऱ्यात आता राज्यसभा आणि विधान परिषदेच्या गप्पाही रंगू लागल्या आहेत. साताऱ्याला आता तीन खासदार व नऊ आमदार मिळणार या पोस्टनी सोशल मीडियाचा अवकाशही व्यापला जात आहे. त्यातून पराभूत झालेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनाही बळ मिळत आहे. 

विधानसभेच्या निवडणुकांबरोबर साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूकही लागली होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष साताऱ्याच्या निवडणूक निकालांकडे होते. उदयनराजे भोसले व श्रीनिवास पाटील यांच्यातील लढतीची, तर सर्वाधिक उत्सुकता होती. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी बाजी मारली. हा निकाल लागतानाच साताऱ्यात दुसरा एक धक्कादायक निकाल लागला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षप्रतोद व दोन्ही राजे सोडून गेल्यानंतर ज्यांच्याकडे जिल्हा राष्ट्रवादीची कमान आली होती त्या शशिकांत शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला.

उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी जसा लोकसभेचा निकाल लागला तशीच अवस्था राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे. लोकसभेची सीट आली, तरी पक्षाचा सिंह गेला अशीच भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या फेसबुकपासून अनेक कार्यकर्त्यांनी अशीच पोस्ट शेअर केली आहे. 

दरम्यान, काल दिवसभर कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या चर्चांनी आता नवे स्वरूप आले आहे. उदयनराजेंचा पराभव हा भाजपसाठी नक्कीच धक्कादायक आहे. उदयनराजेंच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला संदेश देण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला त्यामुळे खीळ बसू शकते. त्यासाठी त्यांना उदयनराजेंचे योग्य पुनर्वसन करावेच लागणार आहे. त्यामुळे उदयनराजे राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार आणि साताऱ्याला तीन खासदार मिळणार अशा चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाल्या आहेत.

खुद्द उदयनराजेंनाही आज पत्रकारांनी दिल्लीला जाण्याबाबत प्रश्‍न विचारला. त्यावर दिल्लीला तर जाणारच असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे कार्यकर्त्यांना आणखी बळ मिळाले आहे. तशीच परिस्थिती राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे. बालेकिल्ल्यात युतीचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे गड शाबूत राखण्यासाठी त्यांना जिल्ह्यामध्ये एका लढवय्या नेत्याची गरज भासणार आहे. त्या दृष्टीने शशिकांत शिंदे यांच्याकडे बघितले जाते. दोन्ही राजेंच्या पक्षांतरानंतर झालेल्या शरद पवार यांच्या सभेच्या वेळी त्यांनी ते दाखवूनही दिले.

त्यामुळे राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल, अशा चर्चा कार्यकर्त्यांत रंगत आहे. त्याला धनंजय मुंडे यांच्या विजयाची जोड दिली जात आहे. त्यांच्या विजयामुळे विधान परिषदेची जागा रिक्त होणार आहे. त्यामुळे शशिकांत शिंदेंना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतले जाईल, असा कयास कार्यकर्ते बांधत आहेत. त्याबाबतच्या पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह येऊ लागला आहे. नक्की काय होईल, हे नजीकच्या काळात समोर येईलच. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara district got three MPs and nine MLAs