Vidhan Sabha 2019 सातारा जिल्ह्यात पून्हा पारंपरिक लढतीच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

येत्या सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे स्पष्ट होईल.

सातारा ः सातारा जिल्ह्यातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांत या वेळीही पारंपरिक लढती होणार, असे आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे स्पष्ट होईल. दरम्यान माण मतदारसंघात भाजपमधून जयकुमार गोरे, तसेच शिवसेनेतून शेखर गोरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने येथे चूरस निर्माण झाली आहे. 

या उमेदवारांनी भरले अर्ज... 

पाटणला देसाई विरुद्ध पाटणकर 

पाटण ः आमदार शंभूराज देसाई (शिवसेना), सत्यजितसिंह पाटणकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस), दीपक महाडिक (अपक्ष), शिवाजी कांबळे (बहुजन समाज पार्टी), शरद एकावडे (संभाजी ब्रिगेड). 
या मतदारसंघात देसाई विरुद्ध पाटणकर अशी पारंपरिक लढत होईल. विद्यमान आमदार देसाई यांनी आतापर्यंत दोन वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना पाटणकर यांचे कडवे आव्हान असणार आहे. 

कऱ्हाड दक्षिणला तिरंगी लढत 

कऱ्हाड दक्षिण ः माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (कॉंग्रेस आघाडी), डॉ. अतुल भोसले (भाजप- महायुती), ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर (रयत संघटना, अपक्ष). 
या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर डॉ. अतुल भोसले यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. याच मतदारसंघात माजी विधी व न्याय मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने येथील लढत तिरंगी होईल, असे चित्र आहे. गतवेळेस चव्हाण हे विलासराव आणि डॉ. भोसले यांच्या विरोधातच निवडून आले होते. 

साताऱ्यात पक्ष बदलले; पण लढत पारंपरिकच... 

सातारा ः आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप), माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी), अभिजित बिचुकले. 
या मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे हे आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर तीन वेळा निवडून आले आहेत. भोसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशानंतर दीपक पवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत जाणे पसंत केले. आता त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंपुढे आव्हान उभे केले आहे. गेल्या निवडणुकीत पवार यांचा शिवेंद्रसिंहराजेंनी पराभव केला होता. 

वाईत पाटील- भोसलेंच्यातच लढत 

वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर ः आमदार मकरंद पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी), माजी आमदार मदन भोसले (भाजप), पुरुषोत्तम जाधव (अपक्ष-शिवसेना) 
या मतदारसंघात विद्यमान आमदार मकरंद पाटील आणि माजी आमदार मदन भोसले या दोघांतच नेहमी निकराची लढत होत असते. मदन भोसले हे पूर्वी कॉंग्रेस पक्षात होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या वेळीही दोन्ही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरले आहेत. दोघांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी सेनेकडून पुरुषोत्तम जाधव यांनी निवडणूक लढविली होती. जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने जाधव यांनी बंडखोरी केली आहे. 

माणला गोरे बंधूंच्यात टक्कर 
माण- खटाव ः आमदार जयकुमार गोरे (भाजप), शेखर गोरे (शिवसेना), प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख (सर्वपक्षीय आघाडी), नारायण काळेल (बहुजन समाज पार्टी), महेश सराटे (बहुजन समाज पार्टी), हणमंत देशमुख (अपक्ष), अमृत सूर्यवंशी (बहुजन समाज पार्टी). 
लोकसभा निवडणुकीनंतर विद्यमान आमदार जयकुमार हे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी तत्कालीन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, तसेच भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना सहकार्य केले. रणजितसिंह यांना खासदार करण्यात गोरेंचा महत्त्वपूर्ण वाटा मानला जातो. 
जयकुमार गोरे हे भाजपमध्ये येण्यापूर्वी त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या दोघांनीही पक्षाने दिलेल्या एबी (अधिकृत पत्र) फॉर्मद्वारे उमेदवारी अर्ज भरला आहे. दुसरीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षाने एकत्रित येऊन गोरे बंधू विरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये अनिल देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. सद्यस्थितीत प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख यांनी ही उमेदवारी अर्ज भरले आहेत. 

कऱ्हाड उत्तरमध्ये तिरंगी लढत 

कऱ्हाड उत्तर ः आमदार बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी), धैर्यशील कदम (शिवसेना), मनोज घोरपडे (अपक्ष), संतोष कमाने (अपक्ष). 
या मतदारसंघातून आमदार बाळासाहेब पाटील हे चार वेळा विजयी झाले आहेत. ते पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातून मनोज घोरपडे हे भाजपमधून सक्रिय होते. कॉंग्रेसचे धैर्यशील कदम हे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ सेनेला गेला. कदम यांनी नुकताच सेनेत प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतली. आता मनोज घोरपडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने येथे तिरंगी लढत होईल, असे चित्र आहे. 

कोरेगावात दुरंगी लढत 
कोरेगाव ः आमदार शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी), महेश शिंदे (शिवसेना), वैशाली शिंदे, प्रदीप पवार (अपक्ष), संतोष भिसे (अपक्ष), प्रिया शिंदे, रणजितसिंह भोसले, प्रिया नाईक, शशिकांत जगन्नाथ शिंदे (सर्व अपक्ष). या मतदारसंघात विद्यमान आमदार शशिकांत शिंदे हे दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी महेश शिंदे यांनी भाजपच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला आहे. जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. महेश शिंदे यांनी सेनेत उडी मारून उमेदवारी अर्ज भरला आहे. या मतदासंघात प्रथमच शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्यात सामना रंगणार आहे. 

फलटणला पारंपरिक लढत 
फलटण ः आमदार दीपक चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस), दिगंबर आगवणे (महायुती), अरविंद आढाव (वंचित बहुजन आघाडी), विकास काकडे (अपक्ष), चंद्रकांत अहिवळे (अपक्ष), अमोल पवार (प्रजासत्ताक भारत पक्ष). कांचन खरात (अपक्ष), डॉ. महेंद्र जगताप (शिवसेना), उमाकांत कांबळे (अपक्ष), प्रदीप मोरे (बहुजन समाज पक्ष), डॉ. प्रवीण आगवणे (अपक्ष, भारतीय जनता पक्ष), जयश्री दिगंबर आगवणे (अपक्ष), प्रशांत कोरेगावर (अपक्ष), अमोल पाटोळे (अपक्ष), अमोल करडे (अपक्ष), पांडू अहिवळे (अपक्ष), नंदू मोरे (अपक्ष), चंद्रकांत साळवी (अपक्ष). 
या मतदारसंघात रामराजे व संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली दीपक चव्हाण यांनी दोन वेळा विजय मिळविला आहे. या वेळीही चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी महायुतीने पुन्हा एकदा दिगंबर आगवणे यांना रिंगणात आणले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Satara district it is a traditional fight again