सातारा होणार रॉकेलमुक्त

उमेश बांबरे
मंगळवार, 23 जुलै 2019

तालुकानिहाय ग्राहकांची संख्या 
तालुकानिहाय पहिल्या टप्प्यात गॅस कनेक्‍शन मिळणाऱ्या ग्राहकांची संख्या अशी - सातारा १७६८, जावळी ६६३९, वाई ३७७५, कोरेगाव ४३७७, महाबळेश्‍वर २२४२, खंडाळा ४४८२, कऱ्हाड २३,५०४, पाटण १५,१३६, माण १३,५५८, खटाव १०,५८०, फलटण ७३२४.

सातारा - आतापर्यंत धूरमुक्त जिल्हा झाला. आता रॉकेलमुक्त जिल्हा करण्याचे उद्दिष्ट पुरवठा विभागाने घेतले आहे. त्यानुसार रेशनवरून रॉकेल घेणाऱ्या सर्व कुटुंबांना गॅस कनेक्‍शन दिले जाणार आहे. त्यासाठी केवळ १०० रुपये अनामत रक्कम भरावी लागेल; पण शेगडीचे पैसे मात्र, ग्राहकांना भरावे लागतील. यातून रॉकेलमुक्त जिल्हा म्हणून साताऱ्याचा नावलौकिक होणार आहे. सध्या रॉकेल घेणारे लाभार्थी संख्या ९३ हजार २९९ असून, या लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने गॅस कनेक्‍शन दिले जाणार आहे.  

आतापर्यंत शासनाने अनेक योजना आणल्या. त्या सर्व योजनांमध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेऊन त्या यशस्वी केल्या. रेशनवरील रॉकेलचा होणारा काळाबाजार रोखताना शासनाने अनेक कडक पावले उचलली आहेत. आता तर रेशन दुकानातून बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करून रेशन दिले जाते.

त्यामुळे कोणत्या कुटुंबाने धान्याचा किती कोटा उचलला याची माहिती उपलब्ध होते. यापुढे जाऊन आता रॉकेल विक्री दुकानातून होणारा निळ्या रॉकेलचा काळाबाजारावर पूर्णपणे अंकुश ठेवण्यासाठी संपूर्ण जिल्हा रॉकेलमुक्त करण्याचा निर्धार पुरवठा विभागाने केला आहे. त्यानुसार सर्वप्रथम रेशनवरून रॉकेल घेणाऱ्या प्रत्येक तालुक्‍यातील कुटुंबांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे रॉकेलची मागणी पूर्णपणे कमी होणार आहे.

केवळ अंत्यविधीसाठी लागणारे रॉकेल मूळ बाजारभावाप्रमाणे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यातील रॉकेल घेणाऱ्या कुटुंबांना आता गॅस कनेक्‍शन मिळणार आहे. त्यासाठी त्यांना केवळ १०० रुपये अनामत भरावे लागेल. केंद्र सरकारच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतून हे कनेक्‍शन मिळणार आहे. रॉकेल घेणाऱ्यांच्या याद्या रेशन दुकानदारांकडून घेऊन ती यादी पुरवठा विभाग गॅस एजन्सींना देणार आहेत. गॅस एजन्सीने या याद्या पाहून संबंधितांना गॅसचे वितरण करायचे आहे. यासाठी केवळ १०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार असून, गॅस शेगडीचे पैसेही ग्राहकांलाच भरावे लागतील. त्यामुळे रेशन दुकानातून रॉकेल घेणाऱ्यांची पूर्णपणे कमी होणार आहे. यातूनच सातारा जिल्हा रॉकेलमुक्त करण्याचा निर्धार पुरवठा विभागाने केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara District Kerosene Free