सुकलेली झाडे... तुटलेली खेळणी! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

सातारा - कोमेजलेली झाडे-झुडपे, सर्वत्र पसरलेला पालापाचोळा, मोडकी बाके, तुटलेली खेळणी, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, अपुरा प्रकाश अशा साताऱ्यातील प्रमुख उद्यानांची स्थिती आहे. मुलांना खेळायला घेऊन जायलाही पालकांनाच लाज वाटावी, अशी ही उद्याने सुधारायची कधी, असा सवाल आहे. 

सातारा - कोमेजलेली झाडे-झुडपे, सर्वत्र पसरलेला पालापाचोळा, मोडकी बाके, तुटलेली खेळणी, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, अपुरा प्रकाश अशा साताऱ्यातील प्रमुख उद्यानांची स्थिती आहे. मुलांना खेळायला घेऊन जायलाही पालकांनाच लाज वाटावी, अशी ही उद्याने सुधारायची कधी, असा सवाल आहे. 

साताऱ्यात आठ ते दहा ठिकाणी उद्याने असली, तरी त्यातील सुमित्राराजे उद्यान (सदरबझार), प्रतापसिंह उद्यान (राजवाडा), शाहू उद्यान (गुरुवार बाग), आंबेडकर उद्यान (पालिकेसमोर) हीच प्रमुख उद्याने आहेत. आंबेडकर उद्यान हे नागरिकांसाठी कायम बंद असते. प्रतापसिंह उद्यान, शाहू उद्यान ही साताऱ्यातील दोनच बऱ्या स्थितीतील उद्याने सेवेत आहेत. हिरवळ आणि फुलझाडांचा अभाव, अशांतता, मोडकी- तोडकी खेळणी, गंजक्‍या, पत्रा फाटलेल्या घसरगुंड्या अशी काहीशी कमी- अधिक अवस्था या दोन उद्यानांत दिसते. गेंडामाळावर नव्याने विकसित होत असलेले हुतात्मा उद्यान अद्याप अपूर्णावस्थेत आहे. 

प्रतापसिंह उद्यानात मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडला आहे. त्यावरून उद्यानात दोन- दोन महिने झाडलोट झालेली दिसत नाही. मुलांच्या खेळण्याच्या विभागात खेळणी सुस्थितीत असली, तरी समुद्र रेतीचा अभाव आहे. पूर्वीच्या रेतीची आता माती झाली आहे. ही रेती बदलण्याची गरज आहे. उद्यानांत छोट्या व मध्यम आकाराच्या फुलझाडांचा अभाव आहे. बसण्यासाठी पुरेशी बाकडी नाहीत. विक्रेत्यांची बागेच्या प्रवेशद्वारासमोरच गर्दी असते. शाहू उद्यानाचा परिसर शहरातील इतर उद्यानांपेक्षा मोठा आहे. याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पालापाचोळा साठला आहे. काही बाकड्यांच्या मागे लोकांनी खाऊन फेकून दिलेल्या पत्रावळ्यांचा ढिग दिसतो. त्यामुळे आपण उद्यानात नसून कचराकुंडीजवळून फेरफटका मारायला आलो का? असा प्रश्‍न पडतो. खेळण्यांच्या विभागातील काही खेळणी मोडली आहेत. समुद्र रेतीचा अभाव आहे. खेळताना मुली पडल्यास दुखापत होण्याची शक्‍यता बळावते. शहरातील एकाही उद्यानाबाहेर पार्किंगसाठी जागा नाही. लोकांनी यायचे कसे आणि आपली वाहने कोठे उभी करायची, असा प्रश्‍न पडतो. 

शाहू उद्यान काही लोकांच्या "खिशात' 
शाहू उद्यानातील रंगीत- संगीत कारंजे बंद असते. या उद्यानात पुरेशी जाग असल्याने अभिनव कल्पना राबविण्याला वाव आहे. मात्र, नावीन्याचा अभाव असलेल्या मंडळींच्या खिशात उद्यान असल्याने नागरिकांना तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करावा लागत आहे. हे उद्यान चांगल्या पद्धतीने विकसित केल्यास शहरातील नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण होऊ शकेल.

Web Title: satara garden issue