रिमझिम पाऊस, धुके, सुखद गारव्यात रंगली सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा

रिमझिम पाऊस, धुके, सुखद गारव्यात रंगली सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा

सातारा - धुक्‍याची दुलई, रिमझिम पडणारा पाऊस, पाहावे तिकडे डोळ्यांना सुखावणारे हिरव्या गालिचाने नटलेले डोंगर, त्यातून जाणारा वळणावळणाचा ओला रस्ता अन्‌ मंद वाऱ्याने जाणवणारा सुखद गारवा अशा उल्हसित करणाऱ्या वातावरणात आज पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा अमाप उत्साहात झाली. ओल्या हिरव्या वातावरणातही निनादणारे ढोल-ताशे धावपटूंचा उत्साह वाढवत होते. 

तालीम संघाच्या मैदानावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते स्पर्धेस सकाळी सहा वाजता प्रारंभ झाला. त्यावेळी पीएनबी मेटलाईफचे मुख्य विपणन अधिकारी निपुण कौशल, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, रनर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित जगधने, निशांत गवळी उपस्थित होते. काहीसे धुके, अधूनमधून रिमझिम पावसात धावपटू मार्गक्रमण करीत होते.

स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी सातारकर भल्या सकाळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाद्यांचा अव्याहत निनाद सुरू होता. शहरातील मार्गावर सातारकर धावपटूंना ‘चिअर अप’ करून प्रोत्साहन देत होते. मजल दरमजल करत स्पर्धक यवतेश्‍वर घाट रस्त्याला लागले. तसे ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’असा जयघोष वातावरणात भरून राहिला. घाटातील वातावरण तर आज कोणाही निसर्गप्रेमीला खिळवून ठेवणारे होते. पावसाची रिमझिम सुरू असतानाच धावपटूंना साथ देत धुकेही पळत होते. जणू त्यांच्यासाठी धुके आज दुलई बनून राहिले होते. वाजणारे ढोल-ताशे धावपटूंचा उत्साह वाढवत होते. ही स्पर्धा सातारकरांच्या नसानसात जणू भिनून गेली होती. एवढेच नव्हे तर काही युवक, नागरिक विविध मालिका, चित्रपटांतील व्यक्तीरेखांचे पोशाख परिधान करून धावपटूंना प्रोत्साहन देत होते. स्पर्धेच्या परतीच्या वेळीही प्रोत्साहन देणाऱ्यांचाही उत्साह कमी झालेला नव्हता. जिद्दीने पळणाऱ्या धावपटूंइतकेच सातारकरही त्याच ऊर्मीने त्यांना टाळ्यांनी दाद देत ‘गणपती बाप्पा मोरयाचा...’ चा घोष करीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com