केळघर भाग डेंजर झोनमध्ये

केळघर भाग डेंजर झोनमध्ये

केळघर : येथे बुधवारी (ता. २७) बाधित रुग्णाच्या संपर्कातील वाहनचालक व निकट सहवासित युवक असे दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येथील कोरोना बाधितांची संख्या सहा झाली. त्यामुळे केळघर विभाग डेंजरझोनमध्ये आला आहे. 22 मे रोजी विलगीकरणासाठी दाखल असलेल्या सहापैकी चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. वाहनचालक व युवकाच्या संपर्कात आलेल्या 11 जणांचे घशातील स्रावांचे नमुने गुरूवारी (ता. २८) तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत, 


बुधवारी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तहसीलदार पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कवारे, मंडलाधिकारी ए. ए. मेनन, आरोग्य सहायक सतीश मर्ढेकर, विशाल रेळेकर, तलाठी संदीप ढाकणे, एम. आर. डोईफोडे, आरोग्य सेवक मोहन शिंदे, आस्मा शेख, सरपंच रवींद्र सल्लक, शंकर जांभळे यांनी मुंबईवरून आलेला कारचालक कुणाच्या संपर्कात आला आहे का? याची माहिती घेतली. मुंबईवरून गाडीतून येथील 58 वर्षीय व्यक्तीस व त्याच्या कुटुंबातील तीन जणांना घेऊन चालक 24 मे रोजी रात्री आला होता. त्या 58 वर्षांच्या व्यक्तीसह एकूण चार जण पॉझिटिव्ह आले होते. 

हा वाहनचालक बाधिताच्या संपर्कात आल्याने चालकास रायगाव येथे विलगीकरणासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी या चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तो मुंबईतून भाडे घेऊन गावाकडे फेऱ्या मारत होता. आज या चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधित रुग्णांच्या साखळीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. प्रथम 58 वर्षीय बाधित रुग्णाच्या सहवासात आलेल्या 16 वर्षांचा युवकाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या सहा झाली आहे. वाहनचालक व युवकाच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना गुरूवारी तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कवारे यांनी दिली. या 11 जणांमध्ये आठ पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. 

या 11 जणांच्या संपर्कात अजून कोण- कोण आले आहे का? याची माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू आहे. दरम्यान, परिसरात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. आणखी कोण व किती बाधीत निघतात याची परिसरातील नागरिकांना चिता लागलेली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com