सातारा पालिकेच्या सभेत "दंगल'! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

सातारा - विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही आवाज चढविल्याने सातारा पालिकेच्या आजच्या सभेत "दंगल' अनुभवायला मिळाली. विरोधी पक्षाने दुखऱ्या बाबींवर बोट ठेवल्याने सत्ताधाऱ्यांनी अक्षरश: ही सभा गुंडाळली. आरोप- प्रत्यारोपांच्या गोंधळात सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर सर्व विषय मंजूर केले. विरोधकांनी सभेच्या कामकाजावर आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे आव्हान देणार असल्याचे सूतोवाच केले. 

नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर नव्या कार्यकारिणीची आजची पहिलीच सर्वसाधारण सभा होती. विषय पत्रिकेवर अवघे चार विषय होते. त्यातील मागील सभेचे इतिवृत्त वाचनावरून गोंधळाला सुरवात झाली. विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी "दलित वस्ती'च्या आठपैकी चारच विषय जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी कसे पाठविण्यात आले, असा सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. भाजपच्या सिद्धी पवार यांनी मागील इतिवृत्ताचे पूर्ण वाचन करावे, अशी मागणी केली. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभाव टाकण्यासाठी कास अंतर्गत 16 गावांचे पाणी अडवून नंतर लगेच त्यांना कर भरण्यासाठी सवलत देणारे पत्रक सत्ताधाऱ्यांनी काढल्याचा आरोप विरोधी पक्षाचे गट नेते अमोल मोहिते यांनी केला. पाण्याचा टॅंकर आणि स्वच्छताविषयक मते मांडत असताना बाळासाहेब खंदारे यांना वसंत लेवे यांनी विरोध केला. तक्रार असेल तर नगराध्यक्षांच्या कक्षात करा, सभेचा वेळ घेऊ नका, असे श्री. लेवे यांनी सुनावले. 

नंतर सभागृहातील गोंधळ अधिकच वाढत गेला. ऍड. दत्ता बनकर यांनी मंजूर, मंजूरचा घोष सुरू केला. एकमेकांकडे हातवारे करत सत्ताधारी व विरोधी पक्ष परस्परांवर तुटून पडले. अशोक मोने, अमोल मोहिते, भाजपचे गटनेते धनंजय जांभळे, विजय काटवटे, पालिकेचे उपाध्यक्ष राजू भोसले, "साविआ'च्या गटनेत्या स्मिता घोडके, ऍड. बनकर, सुहास राजेशिर्के, वसंत लेवे, किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर आदींनी नगराध्यक्षांपुढील जागेत धाव घेतली. या गोंधळातच राष्ट्रगीत सुरू झाले. 

Web Title: satara municipal politics