‘हरित सातारा’ला जनावरांची बाधा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

सातारा - सातारा नगरपालिकेने लाखो रुपये खर्चून राजपथाच्या दुतर्फा फुलझाडे लावली. मात्र, मोकाट जनावरांनी झाडांची पाने ओरबडून खाल्ल्याने काही झाडांचे नुकसान झाले आहे. पालिकेने या झाडांना ट्री गार्ड बसवावेत तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातारकरांतून होत आहे. 

सातारा - सातारा नगरपालिकेने लाखो रुपये खर्चून राजपथाच्या दुतर्फा फुलझाडे लावली. मात्र, मोकाट जनावरांनी झाडांची पाने ओरबडून खाल्ल्याने काही झाडांचे नुकसान झाले आहे. पालिकेने या झाडांना ट्री गार्ड बसवावेत तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातारकरांतून होत आहे. 

‘हरित सातारा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालिकेने राजपथ तसेच कर्मवीर पथाच्या बाजूला वृक्षारोपण केले आहे. साधारण ३० फूट अंतरावर ही रोपं लावण्यात आली. राजपथावर मोती चौक ते शाहू चौक दरम्यान ९० झाडे लावण्यात आली. तसेच कर्मवीर पथावर पोवई नाका ते पोलिस मुख्यालय दरम्यान वृक्षारोपणाचे काम सुरू आहे. चार ते सहा फूट उंचीची ही रोपे आहेत. ‘बकुळ’ व ‘ताम्हण’ या झाडांचा त्यात समावेश आहे. गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदा पालिका पदाधिकारी व प्रशासनाला या दोन्ही प्रमुख रस्त्यांवर झाडे असावीत असे वाटले, हेच कौतुकास्पद आहे. या दोन्ही ठिकाणी झाडे लागली खरी परंतु, शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांनी या रोपांच्या पानांचा फडशा पाडायला सुरवात केली आहे. 

साताऱ्यात काही लोकांनी भेकड जनावरे आणून सोडली. या जनावरांनी शहरातील प्रमुख  रस्त्यांवर अक्षरश: उच्छाद मांडला आहे. राजपथावर देवी चौक ते कमानी हौद दरम्यानची काही रोपांची पाने मोकाट जनावरांनी खाल्ली आहेत. या जनावरांच्या हिसक्‍यामुळे काही रोपं मुळातून उपटली गेली आहेत. या झाडांच्या देखभालीवर पालिका लाखो रुपये खर्च करणार आहे. ही झाडं एक वर्ष जगविण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे.

मोकाट जनावरांनी रोपं खाल्ली तरी ठेकेदारास दुसरे लावावे लागणार आहे. मात्र रोपांचे नुकसान होऊ नये म्हणून पालिकेने आधीच खबरदारी घ्यावी. 
- कन्हैयालाल राजपुरोहित, पर्यावरणप्रेमी नागरिक

Web Title: Satara Municipality Green satara