युद्धात जिंकले अन्‌ तहात हरले!

Satara-Nagarpalika
Satara-Nagarpalika

सातारा - सातारा नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच ‘रिक्विझिशन मिटिंग’ छत्रपती शिवाजी सभागृहाने पाहिली. लोकशाहीचा गळा घोटू पाहणाऱ्या बहुमताच्या एकाधिकारशाहीविरुद्ध वापरण्यासाठी नगरपालिका अधिनियमाने विरोधी पक्षांना हत्यार दिले आहे; पण साताऱ्याच्या कालच्या सभेत नगर विकास आघाडीला ते चालवता आले नाही. युद्धात जिंकले अन्‌ तहात हरले, अशी विरोधी नगर विकास आघाडीची अवस्था झाली. 

सातारा पालिकेच्या किंबहुना सातारा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच पालिका अधिनियमातील कलम ८१/३ चा वापर झाला. सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने ‘रिक्विझिशन मिटिंग’ नामुष्कीची बाब असते. सत्तारूढ सातारा विकास आघाडीला त्यामुळे सभा फारच मनाला लागली. दोन्ही आघाड्यांच्या दृष्टीने ही सभा प्रतिष्ठेचा प्रश्‍न बनली होती. दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांचे सभेच्या कामकाजावर लक्ष होते. 

सातारा विकास आघाडीने नाखुशीने का होईना पण राजकीय शह देण्यासाठी चांगली तयारी केली होती. विशेषत: वसंत लेवे, ॲड. दत्ता बनकर, सुहास राजेशिर्के याबरोबर सागर साळुंखेसारख्या नवख्या सदस्याने चर्चेत हिरिरीने भाग घेतला. नगर विकास आघाडीचा होमवर्क कमी पडल्याचे सभागृहात चित्र पाहायला मिळाले. विरोधी पक्ष नेते अशोक मोने हे एकटेच बॅटिंग करत होते. ‘नॉन स्ट्राईक’ला त्यांना चांगला साथीदार मिळाला नाही.

अमोल मोहिते, शेखर मोरे- पाटील, रवींद्र ढोणे यांनी विषयावरील चर्चा पुढे नेली. 

‘यापूर्वी नगरपालिका फंड खर्ची पडलेले गोडोली तळे हद्दीबाहेर असल्याचा साक्षात्कार आजच झाला का? किंवा तीन- चार टर्म मतदान करणारे मंगळवारातील रहिवासी अचानक हद्दीबाहेर कसे, कधी गेले’ हे त्यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न बिनतोड होते; परंतु नगर विकास आघाडीत पुरेशी आक्रमकता नव्हती. सदस्यांची देहबोली युद्धाआधीच हार मानलेल्या शिलेदारासारखी होती. विषयपत्रिकेवर तीन विषय असले, तरी तिसऱ्या विषयात दहा ते १५ विकासकामांचा समावेश होता. वादाचे विषय बाजूला ठेवून किमान काही विषय मंजूर करून घेण्याची राजकीय चतुराई ‘नगर विकास’ला दाखवता आली असती. त्यांनी ही संधी गमावली. ‘सातारा विकास’ने सभागृहातील राजकीय लढाई जिंकली असली, तरी नैतिक पातळीवर त्यांचा हा विजय सातारकरांची फसवणूक करणारा आहे.

भाजपचा सवतासुभा कशासाठी?
‘हेवेदाव्यापेक्षा शहराचा विकास हवा,’ असे गोंडस स्पष्टीकरण देत भाजप सदस्यांनी सभागृहात मौन बाळगले. सव्वा कोटी रुपयांची कामे साताऱ्यातच होणार होती. पेव्हर, रिटेनिंग वॉल, गटार, बहुउद्देशीय हॉल ही कामे लोकांशी निगडित नाहीत का, हा शहराचा विकास नाही का? भाजपबरोबरची ‘कऱ्हाड’मधील चर्चा सफल ठरल्याचे हे लक्षण होते. ‘इथून पुढे भाजपचा विकास आम्ही करणार’ हे ॲड. बनकर यांचे वक्तव्य फारच सूचक व भाजपची पुढील साडेतीन वर्षांची पालिकेतील वाटचाल अधोरेखित करणारे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com