तळ्यासाठी लागणार सव्वा कोटी लिटर पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

‘कृत्रिम’चे खोदकाम पूर्ण; २० ते २२ लाखांचा बोजा पालिकेच्या तिजोरीवर
सातारा - प्रतापसिंह शेतीफार्ममधील पालिकेच्या नियोजित कृत्रिम विसर्जन तळ्याचे खोदकाम पूर्ण झाले असून, या तळ्यात सुमारे सव्वा कोटी लिटर पाणी लागणार आहे. मूर्ती विरघळण्यासाठी या ठिकाणी अडीच टन ‘अमोनियम बाय कार्बोनेट’ची व्यवस्था पालिकेने केली आहे. या तळ्यासाठी पालिकेच्या तिजोरीवर २० ते २२ लाख रुपयांचा बोजा पडणार आहे.

गणेशोत्सव व त्यापाठोपाठ येणाऱ्या दुर्गा उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पारंपरिक तळ्यांमध्ये पुन्हा मूर्ती विसर्जन करण्यास असहमती दर्शवत जिल्हा प्रशासनाने कृत्रिम तळ्यावर शिक्कामोर्तब केला. त्यानुसार गणपतराव तपासे मार्गावरील प्रतापसिंह शेती फार्मच्या जागेत कृत्रिम तळे खोदण्यात आले आहे. तळ्याचे खोदकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. साधारणपणे या तळ्याची लांबी १५० फूट व ९० फूट रुंदी आहे. ४० फूट खोल असलेल्या या तळ्यात  एक कोटी २४ लाख ७५ हजार लिटर पाणी लागणार आहे. 

पालिकेने या लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था केली असून, शेती फार्ममधील विहीर तसेच जवळच्या एका खासगी विहिरीचे पाणी पाइपने आणून कृत्रिम तळ्यात सोडण्यात आले आहे. आवश्‍यकता भासल्यास बुधवार नाका टाकीचे पाणी घेण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. सध्या तळ्यात १५ फूट पाणीसाठा झाला आहे. घरगुती मूर्ती विसर्जनासाठी हे पाणी पुरेसे आहे. येत्या चार दिवसांत कृत्रिम तळे पाण्याने काठोकाठ भरलेले असेल, असा विश्‍वास पालिकेच्या संपर्क सूत्रांनी व्यक्त केला. यंदा तळ्यात शहरातील सार्वजनिक मंडळांच्या सुमारे १३० मूर्ती तसेच घरगुती ४०० मूर्तींचे विसर्जन होईल, असा पालिका प्रशासनाचा अंदाज आहे.

कृत्रिम तळ्याचा अंदाजित खर्च
तळे खोदाई खर्च : ६ लाख
प्लॅस्टिकचा लायनर (कागद) : ३ लाख  
पाणी आणण्यासाठी पाइपलाइन : दीड लाख 
मूर्ती विसर्जनासाठी क्रेन : ४ लाख 
लाइफ गार्ड व बॅरिकेटिंग : एक ते सव्वा लाख 
अमोनियम बाय कार्बोनेट : ७५ हजार 
सीसीटीव्ही, प्रकाश योजना आदी : एक ते सव्वा लाख 
(आधार : पालिका सूत्र)

Web Title: satara news 1.25 crore liter for lake