कर्जमाफीच्या पहिल्या यादीत केवळ 2203 शेतकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

सातारा - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील केवळ 2203 शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली आहे. हे शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सभासद आहेत. जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सध्या लोकप्रतिनिधींपैकी कोणी कर्जमाफीसाठी अर्ज केला आहे का, याची छाननी करण्याचे काम जिल्ह्यातील सहकार विभागाचे अधिकारी करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार 60 हजार शेतकरी, नियमित परतफेड करणारे एक लाख 75 हजार, तर पुनर्गठित कर्जदार शेतकरी 15 हजार असे एकूण दोन लाख 50 हजार शेतकऱ्यांना सुमारे 490 कोटींचा लाभ मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. एक हजार 190 गावांतील चावडीवाचन झाले आहे. उर्वरित 319 गावांतील याद्यांचे चावडीवाचन अद्याप बाकी आहे. सध्या हिरवी आणि पिवळी यादी ऑनलाइन प्रसिध्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हिरव्या यादीत नाव असलेले शेतकरी पात्र असे समजले जाऊन त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. पण, दिवाळीपासून या दोन्ही याद्या आपले सरकार पोर्टलवर ओपन होत नव्हत्या. त्यामुळे सहकार विभागाचे अधिकारी सातत्याने पाठपुरावा करत शेवटी आज पहिली ग्रीन लिस्ट ओपन झाली.

यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून केवळ 2203 शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे. पहिल्या टप्प्यात हे शेतकरी पात्र ठरले आहेत. हे सर्व शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सभासद आहेत. आता अर्जात त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांची पिवळी यादी ओपन होण्याची प्रतीक्षा आहे. ही यादी आपले सरकारमधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये लाभार्थींच्या यादीमध्ये दिसणार आहे.

पदाधिकाऱ्यांचा शोध
सध्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला सहकार विभागाने वेगळेच काम दिले आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी कर्जमाफीस पात्र नाहीत. तरीही कोणी अर्ज करून कर्जमाफीची मागणी केली आहे का, याचा शोध घेण्याचे काम सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत. त्यामुळे आधारकार्डचा गैरवापर होण्याचा प्रकारही यातूनच निष्पन्न होणार आहे.

Web Title: satara news 2203 farmer in loanwaiver first list