मानांकनासाठी 25 रुग्णालये शर्यतीत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

सातारा - केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या वतीने ठरवून दिलेल्या राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानांकनासाठी (एनक्‍यूएएस) जिल्ह्यातून 25 रुग्णांलयाची निवड जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे. पुढील वर्षात "एनक्‍यूएएस' मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न केले जात असून, त्यातून आरोग्य सुविधाही सुधारण्यास मदत होणार आहे. 

सातारा - केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या वतीने ठरवून दिलेल्या राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानांकनासाठी (एनक्‍यूएएस) जिल्ह्यातून 25 रुग्णांलयाची निवड जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे. पुढील वर्षात "एनक्‍यूएएस' मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न केले जात असून, त्यातून आरोग्य सुविधाही सुधारण्यास मदत होणार आहे. 

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या वतीने गत एप्रिलमध्ये "एनक्‍यूएएस' मानांकन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले होते. त्यामध्ये सर्वांत जास्त 30 पुरस्कार पटकाविणारे महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम ठरले होते. राज्यातील 28 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि नागपूर येथील महिला रुग्णालय व उस्मानाबाद येथील ग्रामीण रुग्णालयाचा सन्मान करण्यात झाला होता. यामध्ये सातारा जिल्ह्याचाही समावेश असावा, यासाठी आता जिल्हा आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्हा रुग्णालय, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालय यासह तीन ग्रामीण रुग्णालये अणि 20 प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड केली आहे. हे मानांकन मिळाल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे दोन लाखांचा निधीही दिला जातो. 

आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत उत्तरोत्तर वाढ करणे, आरोग्य संस्थांच्या उपयोगीतेमध्ये व सेवा दिलेल्या लाभार्थींच्या प्रमाणामध्ये वाढ करणे हे गुणवत्ता आश्‍वासन कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जिल्हा गुणवत्ता आश्‍वासन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी असून ते वर्षातून चार वेळा सभा आयोजित करतात. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, अतिरिक्‍त जिल्हा आरोग्य अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा गुणवत्ता आश्‍वासन कार्यक्रम सहायक आदींनी तीन सदस्य पथक बनवून रुग्णालयांना भेटी द्यायच्या आहेत. "एनक्‍यूएएस'च्या निकषांनुसार या रुग्णालयांत बदल केले जातील. पुढे केंद्रीय समितीच्या तपासणीत निकष पूर्ण झाल्यास हे मानांकन मिळते. 

...या रुग्णालयांची निवड 

जिल्हा रुग्णालय : सातारा 
उपजिल्हा रुग्णालय : कऱ्हाड 
ग्रामीण रुग्णालये : उंडाळे, मेढा, ढेबेवाडी 
प्राथमिक आरोग्य केंद्रे : कुमठे, लिंब, नागठाणे (ता. सातारा), बावधन (ता. वाई), अहिरे, शिरवळ (ता. खंडाळा), सायगाव (ता. जावळी), वाठार स्टेशन, तडवळे (ता. कोरेगाव), साखरवाडी, तरडगाव (ता. फलटण), पुसेसावळी, कातरखटाव, मायणी (ता. खटाव), रेठरे बुद्रुक, काले (ता. कऱ्हाड), सोनवडे (ता. पाटण), मलवडी, पुळकोटी (ता. माण).

Web Title: satara news 25 hospital races for the ranking