बॅंकांमध्येही मिळणार  आता आधार कार्ड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

सातारा - आधार कार्ड काढणे, त्यात दुरुस्ती करणे सहज शक्‍य होण्यासाठी आता बॅंकांमध्येही आधार कार्ड काढण्याचे केंद्र सुरू केले जाणार आहे. काही सरकारी, खासगी बॅंकांना आधार केंद्र सुरू करण्याचे सरकारने बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या ३१ बॅंकांमध्ये काही दिवसांत ही केंद्रे सुरू  होतील. त्यासंदर्भात दोन प्रशिक्षणेही झाली आहेत.

केंद्र सरकारच्या ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ने (यूआयडीएआय) राष्ट्रीय बॅंकांना आधार कार्ड केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. सातारा जिल्ह्यात सध्या जिल्हा प्रशासन, महाऑनलाइन कंपनीच्या अखत्यारित ७० आधार केंद्रे सुरू आहेत. या निर्णयामुळे त्यात आणखी भर पडणार आहे. 

२०११ च्या लोकसंख्येच्या प्रमाणात १०३ टक्‍के, तर २०१५ च्या लोकसंख्येत जिल्ह्यात १०१ टक्‍के आधार नोंदणी पूर्ण झाली असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. जन्माला येणारे बालक, विद्यार्थी व काहींनी आधार कार्ड  काढले नाही, अशाच तुरळक लोकांचे आधार कार्ड काढणे बाकी आहे. तरीही यापूर्वी आधार कार्ड काढले आहेत. परंतु, त्यात दुरुस्ती करणे आदींचे प्रमाण जास्त आहे. काही नागरिकांच्या हातांचे ठसे उमटत नसल्यामुळे त्यांचे आधार कार्ड काढणे बाकी आहेत. त्यांचे आता डोळ्यांचे स्कॅनिंग करून आधार जोडणी केली जाणार आहे. 

जिल्ह्यातील विविध ३१ बॅंकांमध्ये आता आधार केंद्रे सुरू होणार आहेत. कोल्हापूर येथे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील बॅंकांच्या कर्मचाऱ्यांना दोनदा प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यात साताऱ्यातून २८ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. ते आता आपापल्या बॅंकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील. मात्र, ‘यूआयडीएआय’ची परीक्षा पास झाल्यानंतरच त्यांना आधार जोडणी करण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे बॅंकांत आधार केंद्रे सुरू होण्यास काही दिवस लागू शकतील.

Web Title: satara news aadhar card bank