यात्रेदिवशी ट्रकच्यामध्ये सापडल्याने महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

सातारा : आरळे (ता. सातारा) येथे पडलेला ट्रॅक्‍टर व पाठीमागून आलेल्या ट्रकच्यामध्ये सापडल्याने दुचाकीवरील महिलेचा मंगळवारी (ता. 20) रात्री मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी मृतदेह पोलिस ठाण्यासमोर आणल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

सातारा : आरळे (ता. सातारा) येथे पडलेला ट्रॅक्‍टर व पाठीमागून आलेल्या ट्रकच्यामध्ये सापडल्याने दुचाकीवरील महिलेचा मंगळवारी (ता. 20) रात्री मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी मृतदेह पोलिस ठाण्यासमोर आणल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

नैना विशाल रसाळ (वय 28, रा. बोरखळ, ता. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी (ता. 20) बोरखळची यात्रा होती. रात्री साडेनऊच्या सुमारास घरगुती कामानिमित्त त्या पती विशाल यांच्यासोबत दुचाकीवरून आरळे गावाकडे निघाल्या होत्या. आरळे येथील कै. डी. बी. कदम हॉलसमोर रस्त्यावर एक ट्रॅक्‍टर बंद अवस्थेत उभा होता. निलेश व नैना यांच्या दुचाकीचा वेग ट्रॅक्‍टर जवळ कमी झाला. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला ठोकरले. यामध्ये जोराचा मार लागल्याने नैना यांचा जागीच मृत्यू झाला.

यात्रेत असणाऱ्या ग्रामस्थांना अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर बहुसंख्य ग्रामस्थांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. रस्त्यावरील टॅक्‍टर तातडीने हटविला न गेल्याने नैना यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी मृतदेहासह सातारा तालुका पोलिस ठाणे गाठले. संतप्त ग्रामस्थांमुळे रात्री पोलिस ठाण्यासमोरील वातावरण तणावपूर्ण झाले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, इतर अधिकारी व कर्मचारी तातडीने पोलिस ठाण्यात आले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. अपघातास कारणीभूत असणाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली. अधिकाऱ्यांनी आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला.

दरम्यान, ग्रामस्थांना दिलेल्या आश्‍वासनानुसार पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरणारा ट्रक, ट्रॅक्‍टर व त्यांच्या चालकांना ताब्यात घेतले. अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.

Web Title: satara news accident in aarale women killed