रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

पाटण - तालुक्‍यात परतीच्या पावसाने रखडलेली खरीप हंगामातील भाताची काढणी अंतिम टप्प्यात आहे. तर रब्बीच्या पेरण्यांची लगबग शेतकऱ्यांची सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जास्त पाऊस झाल्याने योग्य वापसा नसल्यामुळे उसाच्या लागणी उशिरा होणार असे दिसत आहे.

पाटण - तालुक्‍यात परतीच्या पावसाने रखडलेली खरीप हंगामातील भाताची काढणी अंतिम टप्प्यात आहे. तर रब्बीच्या पेरण्यांची लगबग शेतकऱ्यांची सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जास्त पाऊस झाल्याने योग्य वापसा नसल्यामुळे उसाच्या लागणी उशिरा होणार असे दिसत आहे.

सोयाबीनच्या काढणीपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने आता उसंत घेतली आहे. सलग दीड-दोन महिने पडत असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक केली. मजुरांचा तुटवडा, अचानक येणारा पाऊस, यामुळे एका दिवसाच्या कामाला शेतकरी तीन-तीन दिवस शेतात राबत होता. सोयाबीन काळे पडले. जास्त कालावधी झाल्याने कस न राहिलेले भात पडल्याने कुजले. अशा अनंत अडचणीतून शेतकऱ्यांनी पिके हातात घेण्याचा प्रयत्न केला.

पावसाने उघडीप दिली असल्याने भाताची काढणी अंतिम टप्प्यात आहे. जास्त कालावधीचे इंद्रायणी भाताचे पीक फक्त काढणीचे शिल्लक आहे. सोयाबीन, मूग, भुईमूग व इतर कडधान्यांची काढणी झालेल्या शेतात रब्बीच्या पेरण्या करण्यात शेतकरी व्यस्त आहे. रब्बी ज्वारी, हरभरा, करडई व मका पिकांची पेरणी करण्याची लगबग सुरू आहे. या आठवड्यात रब्बीच्या पेरण्या पूर्ण होतील. 

अती पावसाने ऊस लागणीसाठी पूर्वमशागत करण्यासाठी योग्य वापसा नसल्याने सुरुच्या लागणी रखडण्याची चिन्हे आहेत. एक महिना उशिरा उसाच्या लागणी होतील अशी परिस्थिती असून, रब्बी हंगामातील गहू पेरणीवरही त्याचा परिणाम होणार आहे. इतर बागायती पिकांच्या लागवडीसाठी पूर्वमशागत करण्यासाठी शेतात योग्य वापसा येण्यास अजून १५ दिवस लागतील. 

Web Title: satara news agriculture farmer