अंगणवाडीताईंना आशा मानधनवाढीची

अंगणवाडीताईंना आशा मानधनवाढीची

सातारा - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसंदर्भात पावसाळी अधिवेशनात आर्थिक तरतूद न केल्यास दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ११ सप्टेंबरपासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला होता. आमदार सतेज पाटील यांनी याबाबत अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी मानधनवाढीचा विचार बोलून दाखवला. त्यामुळे अंगणवाडीताईंना पुन्हा एकदा मानधनवाढीची आशा लागली आहे. 

राज्य सरकारने मानधनवाढीसंबंधी शिफारस करण्यासाठी २० जून २०१६ ला समिती नेमली. चर्चेअंती नऊ मार्चला सेवाज्येष्ठता व शिक्षण यावर आधारित शिफारशी करणारा अहवाल शासनाला सादर केला. ३० मार्चला पंकजा मुंडे यांनी संघटनेशी चर्चा करून एक मेपर्यंत आदेश काढण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र तसा आदेश अद्याप निघालाच नाही. त्यानंतर ३० मे रोजी संपाचा इशारा दिला म्हणून सहा जूनला पुन्हा चर्चा झाली; मात्र अद्याप अर्थ खात्याकडे महिला व बालकल्याण विभागाने प्रस्तावच पाठविला नाही. महिला व बालकल्याणमंत्री वेळकाढू धोरण अवलंबत आहेत, असा आरोप केला जात आहे. 

राज्यात कुपोषणाचे प्रमाण विशेषतः आदिवासी भागात वाढत आहे. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना देण्यात येणारा पूरक पोषण आहार (टीसीआर) ही मुले खातच नाहीत. त्यामुळे त्यावरील कोट्यवधी रुपये 

निधी वाया जात आहे. तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना इंधनासह चार रुपये ९२ पैसे दिले जातात. त्यामध्ये सकाळी लाडू व दुपारी आहार द्यायचा आहे. दर निश्‍चित झाल्यापासून तिपटीने महागाई वाढली. सुमारे ३०० टक्के महागाई वाढली तरी सरकारने २० जुलैला केवळ २० टक्केच वाढ केली आदी विविध मागण्या अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या आहेत. 
या मागण्यांसाठी आतापर्यंत अनेकदा आंदोलने झाली. सरकारच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवला; मात्र त्यांच्या पदरी उपेक्षाच आली आहे.

मानधन वाढीसाठी पावसाळी अधिवेशनात निधीची तरतूद न झाल्यास ११ सप्टेंबरपासून मागण्या मान्य होईपर्यंत राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा विविध संघटनांनी दिला होता.

अधिवेशनात आमदार सतेज पाटील यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा देणे, मानधनवाढ करणे आदी प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर पंकजा मुंडेंनी वित्त विभागाच्या संमतीने व मंत्रिमंडळाच्या मान्यतेने मानधनवाढ करण्याबाबत विचाराधीन असल्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे अंगणवाडीताईंना पुन्हा एकदा मागण्या मान्य होण्याची आशा आहे. 

...अशी आहे मानधनात तफावत 
राज्य.........अंगणवाडी सेविका.........मदतनीस 

पदुचेरी.........१९४८०................१३३३० 
तेलंगणा...........७२००.................३६०० 
केरळ............१००००................७००० 
तमिळनाडू.......८५००.................४२०० 
हरियाणा.........७५००..................३५०० 
आंध्रप्रदेश.......७२००..................३६००
दिल्ली............६०००..................३००० 
आसाम...........६५००..................३२५०
महाराष्ट्र..........५०००...................२५०० 
(महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या माहितीनुसार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com