अंगणवाडीताईंचे पुन्हा ‘जेल भरो’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

सातारा - जानेवारीपासून अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविकांना साडेदहा हजार रुपये व मदतनिसांना साडेसात हजार रुपये मानधन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडीताईंनी सुरू केलेले आंदोलन अद्यापही मिटलेले नाही. आंदोलनाची तीव्रता वाढत असून, आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडीताईंनी ‘जेल भरो’  आंदोलन केले. 

सातारा - जानेवारीपासून अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविकांना साडेदहा हजार रुपये व मदतनिसांना साडेसात हजार रुपये मानधन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडीताईंनी सुरू केलेले आंदोलन अद्यापही मिटलेले नाही. आंदोलनाची तीव्रता वाढत असून, आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडीताईंनी ‘जेल भरो’  आंदोलन केले. 

सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या राज्याध्यक्ष सुजाता रणनवरे, महासचिव शौकत पठाण, कार्याध्यक्ष वैशाली देवकर, निमंत्रक सुरेखा शिंदे, जिल्हाध्यक्ष विमल चुनाडे आदींसह सेविका, मदतनीसांनी ‘जेल भरो’ आंदोलन केले. याप्रसंगी शासन मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत आंदोलनापासून मागे न हटण्याचा निर्धारही आंदोलकांनी केला. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्य घटनेच्या कलम १४ नुसार समान काम समान वेतन या तरतुदीनुसार पाँडेचरी, केरळ, तेलंगणा, दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना साडेदहा हजार, मदतनीसांना साडेसात हजार रुपये मानधन द्यावे, महिला व बालविकास विभागाचे अतिरिक्त सचिवांच्या पत्रानुसार अंगणवाडी सेविकांना सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंतच काम द्यावे, अन्यथा वाढीव तासासाठी १०० रुपयांप्रमाणे सेविकांना वार्षिक ३० हजार, अंगणवाड्यांचे कामकाज सांभाळण्याचे मासिक दोन हजार रुपये मानधन मिळावे, काही सेविका, मदतनीसांनी आपल्या मानधनातून अंगणवाडी केंद्राचे भाडे भरले आहेत. ते शासनाने व्याजासह द्यावे. 

शासनाने आहार बिले वेळेत दिली नाहीत. टीएडीए बिले थकीत आहेत. प्रत्येक अंगणवाडी केंद्रास किमान तीन हजार परिवर्तन निधी मिळावा. सेविका, मदतनीसांना संगणकीय प्रशिक्षण शासनाने मोफत द्यावे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा मिळावा. प्राथमिक शिक्षिकांप्रमाणे सर्व सुट्ट्यांचा लाभ मिळावा. दिवाळीपूर्वी दिवाळीसाठी सेविका, मदतनीसांच्या खात्यावर किमान १५ हजार रुपये शासनाने जमा करावेत, अशाही मागण्या निवेदनात आहेत.

शासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला विरोध केल्याने आंदोलकांनी संयमाची भूमिका घेत पुतळा दहन केले नाही. 
- सुजाता रणनवरे, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघ

Web Title: satara news anganwadi strike