आठवले देणार का कार्यकर्त्यांना न्याय?

आठवले देणार का कार्यकर्त्यांना न्याय?

सातारा - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री झाल्यानंतर रामदास आठवले पहिल्यांदा साताऱ्यात येत आहेत. सत्ता सहभागाला तीन वर्षे झाली, तरी सर्वसामान्य दलित कार्यकर्त्याच्या हाताला काही लागल्याचे दिसत नाही. उलटपक्षी रिपब्लिकन पक्षाच्या गट-तटांतील विभाजनामुळे जायचे कोणाकडे, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडत आहे. अंतर्गत कुरघोड्यांमध्ये कार्यकर्त्यांचीच जिरवण्याचे काम होत असल्याने अनेक जण अडचणीत आलेत. ‘रिपाइं’तील हा सावळागोंधळ थांबवून सर्वसामांन्याच्या कामासाठी संघटना सज्ज करण्याचे आव्हान श्री. आठवलेंसमोर आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर रिपाइं कार्यकर्त्यांना आनंद झाला. सर्वसामान्य दलित कार्यकर्त्याला न्याय मिळण्यासाठी महायुतीत सहभागी होत असल्याचे श्री. आठवले सांगत होते. सत्तेला तीन वर्षे होत आली, तरी अद्याप सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पदरात काही पडताना दिसत नाही. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सत्तेचा लाभ सर्वसामान्य दलित नागरिकांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी रिपाइंचे जिल्ह्यातील नेते व पदाधिकाऱ्यांवर होती. मात्र, त्यात ते अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. 

एकसंधपणे काम करण्याऐवजी जिल्ह्यातील रिपाइंचे गटा-तटात विभाजन झाले आहे. आपल्यापेक्षा जास्त काम कोणाकडून झाले नाही पाहिजे, कोणी जास्त प्रकाशझोतात यायला नको, या मानसिकतेमुळे जिल्ह्यातील भक्कम रिपाइंची अनेक शकले झाली. अशोक गायकवाडांचा एक गट, दादा ओव्हाळांचा एक, तर किशोर तपासे, अण्णा वायदंडे, अण्णा उबाळे व किशोर सोनावणे यांचा एक गट कार्यरत आहे. विविध मुद्यांवर यांची वेगवेगळी आंदोलने, विविध पद्धतीने काम सुरू असते. मात्र, स्वतंत्रपणे काम करणाऱ्या एकाच गटातील नेत्यांच्या कामात पाय घालण्याचे प्रकार सुरू आहेत.

त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांऐवजी आपापसात भांडण्यात व शह-काटशहामध्येच संघटनेची शक्ती खर्च होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला मदतीसाठी जायचे कोणाकडे, असा प्रश्‍न पडत आहे. त्यासाठी श्री. आठवलेंनी गट-तटांवर जरब बसवून संघटनांत्मक बांधणीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच, सर्वसामान्य दलित कार्यकर्त्याला न्याय मिळेल.

आठवलेंनाच शकले हवी आहेत काय?
संघटनेतील ही अनागोंदी अनेकदा कार्यकर्त्यांनी श्री. आठवलेंसमोर मांडली आहे. मात्र, त्यावर प्रभावी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे दुफळी आणखी वाढत चालली आहे. त्यामुळे संघटनेची शकले श्री. आठवलेंनाच हवी आहेत काय, असा प्रश्‍न निष्ठावंत कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ‘रिपाइं’च्या प्रभावावरही फरक पडला आहे. रिपाइंचा हक्काचा असा निष्ठावंत कार्यकर्ता, मतदार इतर संघटनांकडे वळायला लागला आहे. संघटनेची परिस्थिती अशीच राहिली, तर रिपाइंत केवळ नेते व पदाधिकारीच उरतील, अशी वेळ येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com