शिल्लक निधी गणवेश खरेदीसाठी

शिल्लक निधी गणवेश खरेदीसाठी

शिक्षण विभागाने काढला मध्यमार्ग; ‘एमपीसी’कडून अद्यापही नाही अनुदान
सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू होऊन २० दिवस उलटले, तरीही महाराष्ट्र प्राथमिक परिषदेकडून (एमपीसी) अद्यापही गणवेशासाठी एक कोटी ६५ लाखांचे अनुदान प्राप्त झालेले नाही. विद्यार्थ्यांना लवकर गणवेश मिळावेत, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने मध्यमार्ग काढत शिल्लक निधी गणवेशासाठी दिला आहे. त्यामुळे गणवेश खरेदीचा मार्ग सुकर झाला आहे. पहिली ते आठवीच्या दोन लाख ७३ हजार विद्यार्थ्यांना १५ लाख ३१ हजार मोफत पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी उपलब्ध केली आहेत. 

सरकारी योजनांचा लाभ देताना लाभाच्या वस्तू खरेदी करू न देता त्याचे पैसे थेट संबंधित नागरिकांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पुस्तके दिली जातात. 
 

मात्र, यंदाच्या वर्षी गणवेशाचे पैसे संबंधित विद्यार्थी व पालकाच्या खात्यावर देण्याचा निर्णय सरकारने घेतला. १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या. मात्र, अद्यापही सरकारने गणवेशाचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेशाविना शाळेत यावे लागत आहे. 

प्राथमिक शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना लवकर गणवेश मिळावेत, यासाठी मध्य मार्ग काढला. बांधकामसह इतर कारणांसाठी शिल्लक असलेला सुमारे दोन कोटींच्या निधीपैकी एक कोटी ९१ लाखांचा निधी तालुकास्तवरा वर्ग केला आहे. तालुकास्तरावरून आता शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर पैसे जमा केला जात आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी गणवेश खरेदी करायचे आहेत. त्याची पावती शाळेच्या मुख्याध्यापकाला दाखवावी लागेल. मुख्याध्यापकांनी संबंधित विद्यार्थ्याने गणवेश घेतल्याची खात्री केल्यानंतर विद्यार्थी व त्याच्या आईच्या संयुक्त खात्यावर गणवेशाचे ४०० रुपये जमा करायचे आहेत. त्यामुळे गणवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर काही दिवसांत पैसे जमा होतील. महाराष्ट्र प्राथमिक परिषदेकडे एक कोटी ६५ लाख अनुदानाची मागणी केली असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

पहिल्याच दिवशी मोफत पुस्तकांचे वाटप
सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत २९,४४६, दुसरीत २९,४४६, तिसरीत ३३,९५१, चौथीत ३३,८३९, पाचवीत ३४,४२३, सहावीत ३५,४२१, सातवीत ३७,९७८, आठवीत ३८,५६३ विद्यार्थी असे एकूण दोन लाख ७३ हजार ६७ विद्यार्थी असून, त्यांना १५ लाख ३१ हजार ४५१ पुस्तके देण्यात आली आहेत. सातवीचा अभ्यासक्रम बदलल्याने ही पुस्तके नंतरच्या टप्प्यात देण्यात आली. यावर्षीही नववीचा अभ्यासक्रमही बदलला आहे. मात्र, त्यातील बहुतेक पुस्तके अद्यापही बाजारपेठेत न आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com