बापानेच कुटुंबाला प्रसाद म्हणून दिले विष; मांढरदेवमध्ये मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

कोणताही पुरावा नसताना पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलिस निरीक्षक   येडगे व वाई पोलिस ठाण्यातील पोलिसांनी प्रयत्न करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. 

वाई : मांढरदेव येथे काळूबाईच्या दर्शनासाठी आलेल्या बारामती येथील एकाच कुटुंबातील पाचजणांना विषबाधा झाल्याप्रकरणी कुटुंबप्रमुख विष्णू नारायण चव्हाण (रा. बारामती) व एका अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा व खून करण्यास सहकार्य केल्याचा गुन्हा वाई पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

कोणताही पुरावा नसताना पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलिस निरीक्षक   येडगे व वाई पोलिस ठाण्यातील पोलिसांनी प्रयत्न करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. हा प्रसाद आहे असे खोटे सांगून विष्णू चव्हाण यांनीच आपला मुलगा, दोन मुली, पत्नी व आणखी कुटुंबातील एका महिलेला विष दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामध्ये त्यांचा मुलगा स्वप्नीला याचा मृत्यू झाला. 

मांढरदेव (ता. वाई) येथे काळेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या बारामतीच्या सहा भाविकांना विषबाधा झाली. त्यात एका युवकाचा मृत्यू झाला, तर तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. विषबाधेचे कारण सुरवातीला समजू शकले नव्हते. स्वप्नील विष्णू चव्हाण (वय 25) असे मृताचे नाव असून, तृप्ती विष्णू चव्हाण (वय 16), प्रतीक्षा विष्णू चव्हाण (21), सुनीता विष्णू चव्हाण (45), मुक्ताबाई नारायण चव्हाण (58), चालक भीमसेन अर्जुन जाधव अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, की आज दुपारी दोनच्या सुमारास बारामती येथील श्रीरामनगरमधील चव्हाण कुटुंबातील पाच जण स्कॉर्पिओ गाडीतून (एमएच 42 एएच 7074) मांढरदेव येथे दर्शनासाठी आले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर या कुटुंबातील स्वप्नीलला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने पार्किंगमध्ये असलेल्या गाडीच्या चालकास फोन करून गाडी वर घेऊन येण्यास सांगितले. चालक गाडी घेऊन वर गेला. सर्वांना वाईला आणत असताना घाटातच स्वप्नीलला व इतरांना त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, उपचारापूर्वीच स्वप्नीलचा मृत्यू झाला. प्राथमिक उपचारानंतर अन्य रुग्णांना सातारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, चालक भीमसेन अर्जुन जाधव यालाही त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन पाटील यांनी याबाबत पोलिसांत माहिती दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. येडगे तपास करीत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: satara news baramati news mandhardevi poisoning