रक्‍तदानाच्या शतकोत्तराचा आजही आनंद...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

सातारा - वाढदिवसादिवशी आई मला रक्तदान करण्यासाठी घेऊन गेली. त्यानंतर रक्तदान करण्याची सवय लागून गेली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करू लागल्यानंतर सहकारी मित्रांमुळे वर्षातून चार वेळा नियमित रक्तदान करू लागलो. मात्र, एका किरकोळ अपघाताने रक्तदानाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव राहिला तो राहिलाच... असे उद्‌गार आहेत अजित कुबेर यांचे. 

सातारा - वाढदिवसादिवशी आई मला रक्तदान करण्यासाठी घेऊन गेली. त्यानंतर रक्तदान करण्याची सवय लागून गेली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करू लागल्यानंतर सहकारी मित्रांमुळे वर्षातून चार वेळा नियमित रक्तदान करू लागलो. मात्र, एका किरकोळ अपघाताने रक्तदानाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव राहिला तो राहिलाच... असे उद्‌गार आहेत अजित कुबेर यांचे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नगरवाचनालय, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पूर्वीची जनसेवा आणि आताची माऊली रक्तपेढी ही नावे एकत्र जोडून आली, की अजित कुबेर यांचे नाव ओघानेच येते. सर्वाधिक वेळा रक्तदान केलेला दाता म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. श्री. कुबेर यांनी १२४ वेळा रक्तदान केले आहे. रक्तदानाची शंभरी ओलांडणाऱ्या मोजक्‍या रक्तदात्यांपैकी श्री. कुबेर एक असावेत. 

रक्‍तदात्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी दर वर्षी १४ जून हा दिवस जागतिक रक्‍तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने त्यांना ‘सकाळ’ने बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्यांना रक्तदानाची प्रेरणा त्यांच्या आईकडून मिळाली. श्री. कुबेर यांच्या १८ वा वाढदिवस होता. हा वाढदिवस आपण रक्तदानाने साजरा करू, अशी संकल्पना त्यांच्या आईने मांडली आणि एका वेगळ्या कामाला स्वत:पासून सुरवात झाली. त्यांची आई स्वत: त्यांना रक्तदानाला घेऊन गेली. पुढे वाढदिवस म्हटले, की रक्तदान हा कार्यक्रम ठरून गेला. 

याबद्दल श्री. कुबेर सांगतात, ‘‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत असताना सहकारी मित्रांमुळे नियमित रक्तदानाची सवय लागली. वर्षातून चार वेळा रक्तदान हा कार्यक्रम नंतर ठरूनच गेला. २५...५०...७५ असे करत रक्तदानाची शंभरी ओलांडली. १२४ वेळा रक्तदान झाले. २५ व्या वेळी रक्तदान करण्यापूर्वी काही दिवस कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी लागली. या लसीमुळे मला त्या वेळी रक्तदान करता आले नाही.’’

त्यानंतर श्री. कुबेर यांनी वयाच्या साठीत प्रवेश केला. पूर्वी ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर रक्तदान करता येत नाही, असा नियम  होता. (सध्या तो ६५ वर्षे आहे) त्यामुळे श्री. कुबेर यांची १२५ वेळा रक्तदान करण्याची इच्छा राहूनच गेली. वयोमानामुळे रक्तदान करता येत नसले, तरी ते आज वयाच्या सत्तरीतही तरुणांना लाजवेल, असे काम करतात. माऊली रक्तपेढीचे ते विश्‍वस्त आहेत. जास्तीतजास्त तरुणांना रक्तदान करण्यासाठी ते प्रोत्साहन देतात. विविध ठिकाणी रक्तदानची शिबिरे आयोजित करतात. 

वयाच्या १८ ते ६५ वर्षांपर्यंत रक्तदान करता येते. प्रत्येक निरोगी व्यक्तीने वर्षातून एक ते दोन वेळा रक्तदान करावे. तरुणांनी वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान केल्यास रक्ताची कमतरता भासणार नाही.

- अजित कुबेर

Web Title: satara news blood donate by ajit kuber