ग्रंथमहोत्सवात पुस्तकप्रेमींची मांदियाळी 

ग्रंथमहोत्सवात पुस्तकप्रेमींची मांदियाळी 

सातारा - पुस्तकांना ग्राहक मिळत नाहीत... विद्यार्थीच नव्हे तर प्रौढही फारसे वाचत नाहीत. शाळकरी विद्यार्थी वाचनापासून दूर गेले... असे आरोप विविध व्यासपीठावरून नेहमीच ऐकावयास मिळतात. मात्र, गुलाबी थंडीत सुखावणारे ऊन अंगावर झेलत जिल्हा परिषदेच्या मैदानावरील ग्रंथमहोत्सवात नव्या ज्ञानाचा धांडोळा घेताना आज पुस्तकप्रेमी आढळत होते. महोत्सवातील विविध स्टॉलवरून शाळकरी विद्यार्थी, गृहिणी अन्‌ आजोबाही पिशव्या भरून पुस्तके घरी नेत होते. साताऱ्याचा ग्रंथमहोत्सव नागरिकांना पुस्तकांकडे खेचत आहे. 

पुस्तकांनी खचाखच भरलेल्या स्टॉलवर विक्रम वेताळापासून चाणाक्‍य नीतीपर्यंत, "ओशों'च्या सत्याच्या शोधापासून आ. हं. च्या बळीवंशापर्यंत, डिक्‍शनरीपासून स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांपर्यंत तसेच टारझनपासून बंड्या बडबडेपर्यंत, छोट्या मुलांपासून गृहिणी आणि ज्येष्ठांपर्यंत सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या पुस्तकांची रेलचेल आहे. 
सातारकरांना विविध विषयांवरील लाखो पुस्तके भुरळ घालत आहेत. शालेय विद्यार्थ्यांची पावले फास्टर फेणे, टारझन, श्‍यामच्या आईजवळ जास्त घोटाळत होती, तर अनेक महिलांच्या हातात चिकन सुपपासून खंमग आणि विविध प्रकारच्या बटाटे वड्यांची पुस्तके दिसत होती. महाविद्यालयीन युवती आणि युवक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तकांचा धांडोळा घेत होते. स्टॉलवरील पुस्तके नागरिक आवडीने चाळत होते. विविध नेत्यांची चरित्रे, ऐतिहासिक, धार्मिक ग्रंथ, आयुर्वेदाची सफर घडविणारी उपयुक्त पुस्तके, पुलंपासून ते आजच्या नवनव्या लेखक, कवींच्या पुस्तकांची विविध स्टॉलवर संख्या जास्त आहे. 

वि. स. खांडेकर यांच्या "ययाती'पासून "अश्रू'पर्यंत अन्‌ "क्रिकेट कॉकटेल'पासून "आद्य रेसिपी' अशा खाद्य संस्कृतीवरील पुस्तकांपर्यंतची हजारो पुस्तके स्टॉलवर वाचकांना हाताळायला मिळत आहेत. विज्ञान, शेती, ज्योतिष, प्रवासवर्णने आणि भक्तीपासून विविध खेळांची माहिती देणाऱ्या पुस्तकांपर्यंत कथा, कादंबऱ्यांनीही येथील स्टॉल भरून गेले आहेत. 

रविवारची सुटी असल्याने अनेक शाळांची मुले पुस्तकांच्या स्टॉलवर हजर झाली होती. नवी कोरी आवडीची पुस्तके ती उत्सुकतेने हाताळत होती. जमेल तशी ती विकत घेत होते. कॉलेजचे विद्यार्थी मात्र स्पर्धा परीक्षेसाठीची पुस्तके शोधत होती. यूपीएससी, एमपीएससी, पोलिस भरतीपासून तलाठी भरतीपर्यंतची पुस्तके स्टॉलवर उपलब्ध आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या आवडीच्या कादंबऱ्या आणि धार्मिक पुस्तकांना पसंती देत होते. प्रकाशकांनी खरेदीवर विविध सवलतीही जाहीर केल्या आहेत. 

सवलतीच सवलती... 
नागरिकांना आपल्या स्टॉलकडेच खेचण्यासाठी अनेक प्रकाशकांनी दहा-वीस टक्के सूटही जाहीर केली आहे. तर दीडशे रुपयांचे "श्‍यामची आई' पुस्तक अवघ्या 50 रुपयांत मिळत असल्याने आज शेकडो घरी साने गुरुजींची श्‍यामची आई पोचली आहे. अनेक स्टॉलवर दर्जेदार पुस्तके फक्त 50 रुपयांत दिली जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com