विरमाडेत पूल असून खोळंबा! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

सायगाव - पुणे-बंगळूर महामार्गावरील विरमाडे (ता. वाई) फाट्यावर असलेला अरुंद भुयारी पूल हा "असून अडचण नसून खोळंबा' झाला आहे. पुलातील दुर्दशेमुळे प्रवासी, शेतकरी, ग्रामस्थांना येथून महामार्ग ओलांडणे जीवघेणे ठरू लागले आहे. हा फाटा साक्षात मृत्यूचा सापळा ठरला आहे. 

सायगाव - पुणे-बंगळूर महामार्गावरील विरमाडे (ता. वाई) फाट्यावर असलेला अरुंद भुयारी पूल हा "असून अडचण नसून खोळंबा' झाला आहे. पुलातील दुर्दशेमुळे प्रवासी, शेतकरी, ग्रामस्थांना येथून महामार्ग ओलांडणे जीवघेणे ठरू लागले आहे. हा फाटा साक्षात मृत्यूचा सापळा ठरला आहे. 

आनेवाडी टोलनाक्‍यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विरमाडे फाट्यावर सहापदरीकरण कामात प्रवासी व शेतकऱ्यांना जाण्यासाठी छोटा भुयारी पूल बांधण्यात आला होता. मात्र, योग्य नियोजन न करता बांधण्यात आलेल्या या भुयारी पुलातून वाहतूक करणे म्हणजे जिकिरीचे बनले आहे. गावातील शेतकऱ्यांची शेती ही पूर्वेला आहे. त्यामुळे महामार्ग ओलांडून पुढे जावे लागते. जो भुयारी पूल आहे, त्या पुलामधून चालत जाणेसुद्धा धोकादायक बनले आहे. पुलाखाली मोठ मोठी झाडे झुडपे असून, मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पावसाळ्यात चिखलामुळे संपूर्ण चार महिने हा मार्ग बंदच असतो. त्यामुळे या पुलाची अवस्था "पूल असून अडचण नसून खोळंबा' अशी झाली आहे. त्यामुळे नाइलाजाने ग्रामस्थांना महामार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. कारण येथील फाट्यापासून 30 मीटर अंतरावर असणाऱ्या टोल नाक्‍यावरून वाहने सुसाट सुटलेली असतात. त्यामुळे जीव मुठीत घेऊन हा मार्ग ओलांडावा लागतो. अनेकदा या ठिकाणी मोठ-मोठे अपघात झाले आहेत. त्यातच याच पुलावर वाहनांचा वजन काटा उभारला असल्याने मोठ मोठी वाहने येथे कायम उभी असतात. त्यामुळे पादचारी लोकांना शेतात जाताना आपली जनावरे घेऊन जाताना कितीही लक्ष दिले तरी अचानक कोठून कोणते वाहन येईल व अपघात होईल हे सांगता येत नाही. विरमाडे ग्रामस्थांचे या ठिकाणी अनेकदा अपघात घडून जीव गेले आहेत. काहींना कायम अपंगत्व आले आहे. ग्रामस्थांनी अनेकदा याबद्दल आंदोलन केले. मात्र, कोणतीही दखल न घेता आहे असेच काम कंपनीने सुरू ठेवले असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास भोगावा लागत आहे. 

रास्ता रोकोचा इशारा  
संबंधित कंपनी व अधिकाऱ्यांनी गोड बोलून प्रसंगी कठोर भूमिका घेऊन गावच्या या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर लवकरात उड्डाण पूल उभारावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा विरमाडे ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: satara news bridge Pune-Bangalore Highway