राष्ट्रवादी ‘सेल’मध्ये स्वच्छता मोहीम

उमेश बांबरे 
शुक्रवार, 23 जून 2017

सातारा - आगामी निवडणुका आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या जिल्हा दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय जिल्ह्यातील नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार विविध ‘सेल’च्या कामाचा आढावा आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर भर दिला जाणार आहे. त्यासाठी रविवारी (ता. २५) विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक व मुलाखती होणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील विविध सेलमध्ये शिथिलता आली आहे. पक्षसंघटनेंतर्गत पदाधिकाऱ्यांत असलेल्या हेवेदाव्यातून पक्षाची शिस्त बिघडली आहे. पक्षाची विस्कटलेली घडी बसविण्याबरोबरच आगामी निवडणुकीसाठी पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे काम अजित पवार व सुनील तटकरे हे राज्यभर दौरा करून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन विविध सेलची पुनर्बांधणी करत आहेत. चार जुलैला ते दिवसभर साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते संघटनात्मक बांधणी, नव्यांना पदाधिकारीपदी संधी आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांचे ते कान धरणार आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पक्षाच्या विविध सेलची सध्याची अवस्था, तसेच नव्याने पदाधिकारी होण्यास इच्छुकांशी चर्चा आणि सेलच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रविवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी भवनात रामराजे नाईक-निंबाळकर व शशिकांत शिंदे हे बैठक घेणार आहेत. या बैठकीच्या निमित्ताने पक्षात स्वच्छता मोहीम राबविली जाईल. 

कोणाला संधी... कोणाचा बळी?
या मोहिमेत अनेक नव्यांना संधी, तर गेली अनेक वर्षे पदावर राहून पक्षासाठी कोणतेच भरीव काम न करणाऱ्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. एकूणच सर्व सेल व फ्रंटची पुनर्रचना होईल. राष्ट्रवादीतील या स्वच्छता मोहिमेत कोणाचा बळी, तर कोणाला चांगले दिवस येणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

Web Title: satara news campaign NCP