कत्तलखान्याकडे चालवलेल्या 13 जनावरांना लोणंदमधे जीवदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

टेम्पो सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लोणंद येथील प्राथमिक अरोग्य केंद्रानजीक आला असता शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीस ही बाब पडली. त्यांनी या टेम्पोचा पाटलाग करुन टेम्पो पकडून लोणंद पोलिसांच्या ताब्यात दिला

लोणंद,ता.1 ः येथील शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे फलटण येथून मुंबईकडे कत्तलखान्याकडे एकाच टेम्पोत दाटीवाटीने कोंबून दहा देशी व जर्शी गायी,एक म्हैस व दोन जर्सी खोंड अशी एकूण 13 जनावरे घेवून निघालेला टेम्पो लोणंद येथे पकडून देण्यात आला. 

या प्रकरणी लोणंद पोलिसांनी टेम्पो चालक हणमंत आबाजी सोनवलकर (वय 42) रा.भाडळी बुद्रुक ता.फलटण यास टेम्पोसह (क्रमांक एमएच11-टी-3959) ताब्यात घेतले आहे. दरम्यान या टेम्पोतून ताब्यात घेतलेली जनावरे पोलिसांनी फलटण येथील गोशाळेत पाठवली आहेत.

याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, सोनवलकर 13 जनावरे एकच टेम्पोत दाटीवाटीने कोंबून बेकायदेशीर व विनपरवाना लोणंद-शिरवळ रस्त्यावरुन मुंबईकडे निघाला होता. टेम्पो सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लोणंद येथील प्राथमिक अरोग्य केंद्रानजीक आला असता शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीस ही बाब पडली. त्यांनी या टेम्पोचा पाटलाग करुन टेम्पो पकडून लोणंद पोलिसांच्या ताब्यात दिला. या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे 13 मुख्या प्राण्यांचे जीव वाचले आहेत.

टेम्पो चालक हणमंत सोनवलकर याच्या विरुध्द पोलिस हवालदार विशाल भीमराव वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: satara news: cattle saved