‘सीसीटीव्ही’ उपक्रमास  सकारात्मक प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सातारा - ‘एक मंडळ एक सीसीटीव्ही’ या उपक्रमाला सातारा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सामाजिक जाणिवेतून शहराच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याची हमीही या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या उपक्रमात पुढाकार घेऊच, पण पालिकेनेही आपली जबाबदारी घेत पुढे येण्याचे आवाहन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केले.

सातारा - ‘एक मंडळ एक सीसीटीव्ही’ या उपक्रमाला सातारा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सामाजिक जाणिवेतून शहराच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याची हमीही या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या उपक्रमात पुढाकार घेऊच, पण पालिकेनेही आपली जबाबदारी घेत पुढे येण्याचे आवाहन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केले.

दै. ‘सकाळ’च्या कार्यालयात काल (ता. २२) सातारा शहरातील काही निवडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात ‘एक मंडळ एक सीसीटीव्ही’ या उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी बैठकीस पालिकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश कदम, नगरसेवक धनंजय जांभळे, राजू गोडसे, सूर्यकांत गोरे, विजय भोसले, सचिन साळुंखे, निरंजन चिंचकर, साई सावंत, गणेश केंजळे, अरुण सवारे, धनसिंग जाधव, शशिकांत जाधव, योगेश कुलकर्णी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे व शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांनी उपक्रम राबवण्यामागील ‘सकाळ’ची भूमिका स्पष्ट केली.

शहराची वाढती लोकसंख्या, पोलिसांचे उपलब्ध मनुष्यबळ या सर्वांचा विचार करता कोणत्याही शहराच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे अपरिहार्य झाले आहे. सीसीटीव्हीच्या वापरामुळे शहरातील एकंदर गुन्ह्यांवर अंकुश बसू शकतो. शासकीय पातळीवर या पर्यायांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न होत आहेत. लालफितीच्या कारभारामुळे त्याला फारसा वेग नाही. या पर्यायाला लोकसहभागाचा हात मिळाल्यास शहरातील सीसीटीव्ही प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकतो. गणेश मंडळांना सामाजिक वारसा आहे. त्यातून त्यांनी आपल्या खर्चामध्ये थोडी जरी काटकसर केली तरी, या उपक्रमास मोठा हातभार लागू शकतो. या भूमिकेतून पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी यंदाच्या गणेशोत्सवात ‘एक मंडळ एक सीसीटीव्ही’ हा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. शहरातील महिला, युवती, वृद्ध, महाविद्यालयीन युवकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम अधिक प्रभावी ठरू शकतो. त्यामुळे ‘सकाळ’ने या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच गणेश मंडळांची भूमिका जाणून घेण्यासाठी शहरातील काही निवडक गणेश मंडळांची प्राथमिक बैठक झाली.

पोलिस आणि ‘सकाळ’ने घेतलेल्या या भूमिकेचे गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कौतुक केले. शहराच्या सुरक्षिततेसाठी मंडळे एक सीसीटीव्ही उत्स्फूर्तपणे देतील, असा विश्‍वास बहुतांश सर्वांनीच व्यक्त केला. त्याचबरोबर नगरपालिका प्रशासन, सर्व नगरसेवकांनीही या उपक्रमामध्ये पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमात नगरसेवक व पालिका सक्रिय झाल्यास सीसीटीव्ही बसविण्याचे ठिकाण, डीव्हीआर ठेवण्याची जागा यांचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. त्याचबरोबर सीसीटीव्ही तसेच गणेश मंडळांच्या विसर्जनासह इतर प्रश्‍नासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी राजकारणविरहित सर्वसमावेशक अशी सक्षम यंत्रणा उभारण्यासाठी ‘सकाळ’च्या पुढाकारातून सर्व शहरातील गणेश मंडळांची बैठक घ्यावी, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या बैठकीत एकंदर उपक्रमाची माहिती देऊन कामाला सुरवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सीसीटीव्ही यंत्रणेसाठी पालिकेकडून यापूर्वीच तरतूद
सातारा शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेसाठी नगरपालिकेने यापूर्वीच २० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे. हा निधी पालिका लगेच देऊ शकते. उर्वरित निधीसाठी नगरसेवक, मंडळांचे कार्यकर्ते व शहरातील नागरिक अशा सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास संपूर्ण शहरातील सीसीटीव्हीचा व पर्यायाने शहरातील सुरक्षिततेचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो.

Web Title: satara news cctv camera ganesh mandal