काँग्रेसमध्ये नाना-भाऊंमध्ये रंगला कलगीतुरा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

बाबांकडे नजरा
दरम्यान, जिल्हाध्यक्ष निवडीवरून काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. आता पृथ्वीराज चव्हाण या दोन समर्थकांमधील वादावर कोणता तोडगा काढणार, की नानांच्या हातात हात देऊन गोरेंना ताकद देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सातारा - जिल्हाध्यक्षपदावर सक्षम नेतृत्व असावे, या एकमेव मुद्यावरून जिल्हा काँग्रेसमध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील विरुध्द माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोन निष्ठावंत कार्यकर्त्यांमधील हा वाद विकोपाला जाण्यापूर्वी यावर बाबांनी मध्यस्थी करून तोडगा काढणे गरजेचे आहे. अन्यथा, ऐन पदाधिकारी निवडीच्या तोंडावरच काँग्रेस दुभंगली जाण्याची भीती आहे.

काँग्रेसचे सलग दोन वेळा जिल्हाध्यक्ष होण्याचा मान आमदार आनंदराव पाटील यांना मिळाला. पण, त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या काळात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची सदस्यसंख्या २२ वरून सातवर खाली आली. यातून पक्षाची दिवसेंदिवस स्थिती खालावत असल्याचे चित्र आहे. या सर्व परिस्थितीला काही काँग्रेसजन, आनंदराव पाटील ऊर्फ नानाच जबाबदार आहेत, असे मानून दुसरा गट सक्रिय होऊ लागला आहे. तसे काँग्रेसमध्ये जितके नेते तितके गट असून, प्रत्येक गट आपापल्या भागात सक्षम राहिला आहे. पण, पक्ष म्हणून हे सर्व गट एकत्र येऊन काम करण्यास तयार नसल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे सक्षम नेतृत्व असूनही काँग्रेस पक्षाला लागलेली उतरती कळा कमी होताना दिसत नाही. आता प्रदेश काँग्रेसने पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये तालुकानिहाय क्रियाशील सभासदांची यादी प्रदेश पातळीवर पाठवून दिली गेली आहे. यातूनच ब्लॉक, तालुका, जिल्हाध्यक्ष निवडी होतील, पण ती मतदानाने. काँग्रेसला पुन्हा ऊर्जितावस्था देण्यासाठी कोणीतरी सक्षम नेतृत्व पुढे आले पाहिजे, असे सर्वच काँग्रेसजनांना वाटत आहे. यापूर्वीही काँग्रेसमधील काहींनी माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर पक्षाची जबाबदारी द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. पण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मर्जीतील आनंदराव पाटील हे अध्यक्ष असल्याने कोणाला काही बोलणे अवघड होते. मध्यंतरी भुईंज येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम आले होते. येथे त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी आमदार जयकुमार गोरेंकडे पक्षाची धुरा देण्याचे सूतोवाच केले होते. यानंतर पक्षातीलच पण गोरेंना मानणारा गट एकत्र येऊ लागला. त्यांनी प्रदेशाध्यक्षांपर्यंत याबाबतची मागणी पोचविली. आता तर हा गट उघडपणे जिल्हाध्यक्षपदावर सक्षम नेतृत्व आणण्याची तयारी करू लागला आहे. काल काँग्रेस भवनात पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला मोजून ३२ माणसे होती. त्यामध्ये २० ते २२ पदाधिकारी होते. तेही आनंदराव पाटील यांना मानणारेच होते. पक्षातील आमदार जयकुमार गोरेंना मानणाऱ्या गटातील सर्वांनी या बैठकीकडे पाठ फिरविली होती. त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा उठवत आनंदराव पाटील यांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठविली. पदाधिकारी व्हायचे असेल तर निवडणूक लढा, पक्षात दुही निर्माण करू नका, असा सल्ला त्यांनी गोरेंना दिला आहे. 

Web Title: satara news congress