निवडणुकीपूर्वीच काँग्रेस-भाजपत शीतयुद्ध

राजेंद्र ननावरे
मंगळवार, 4 जुलै 2017

मलकापूर - येथील नगरपंचायतीची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी गट उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यात व्यस्त, तर विरोधी गट विकासकामांत झालेल्या चुकांची माहिती गोळा करण्यात व छोटे -मोठे कार्यक्रमांची आखणी करत चर्चेत राहण्याची तयारी करताना दिसत आहेत.

मलकापूर - येथील नगरपंचायतीची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी गट उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यात व्यस्त, तर विरोधी गट विकासकामांत झालेल्या चुकांची माहिती गोळा करण्यात व छोटे -मोठे कार्यक्रमांची आखणी करत चर्चेत राहण्याची तयारी करताना दिसत आहेत.

एकीकडे विकासकामांची रेलचेल, तर दुसरीकडे निवडणूक रणसंग्रमाची तयारी चालल्याचे चित्र आहे. कोण किती प्रभावी ठरणार, हे काळच ठरवेल. मात्र, विरोधकांच्या आतापासूनच्या तयारीची चर्चा आहे. नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर सलग दोन्ही निवडणुकांत पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाकडे मलकापूरची सत्ता राहिली आहे. मलकापूरची सर्व सूत्रे श्री. चव्हाण यांचे कट्टर समर्थक उपाध्यक्ष मनोहर शिंदे हे प्रभावीपणे संभाळत आहेत. 

सत्ताधाऱ्यांकडून विकासकामेच
नगरपंचायतीच्या नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून मलकापूरचे नाव श्री. शिंदे यांनी देशपातळीवर पोचवले आहे. प्रत्येक नवीन योजना ही राज्याच्या दृष्टीने चर्चेची ठरलेली आहे. २४ तास पाणीयोजना, प्रियदर्शनी कन्यारत्न योजना, प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान, सोलर सिटी, हरीत मलकापूर आदी योजना राबवून त्या यशस्वी करून दाखवल्या आहेत.

नगरपंचायत स्तरावर प्रथमच राबवण्यात आलेली ४१ कोटींची सांडपाणी योजना अंतिम टप्प्यात आहे. त्याशिवाय घनकचरा प्रकल्प, प्लॅस्टिकमुक्त मलकापूर व नव्याने हाती घेतलेला दारूबंदीचा निर्णय यांचा पाठपुरावा करून जनतेच्या पुढे विकासकामांच्या माध्यमातून जायचे असा सत्ताधाऱ्यांचा संकल्प आहे. मोठ्या प्रमाणात निधी आणून श्री. शिंदे आजमितीला उद्या जरी निवडणूक लागली, तरी आम्ही त्यास तयार आहोत, हे दाखवून दिले आहे.

विरोधकही जोशात..!
विधानसभेच्या निवडणुकीनंतर गेल्या निवडणुकीत काँग्रेससोबत असणारे अतुल भोसले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसशी फारकत घेत थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधातच निवडणूक लढवली. तेव्हापासून मलकापूरमध्ये भोसले गटाने श्री. शिंदे गटाबरोबर फारकत घेत सवता सुभा मांडला. आगाशिवनगर नागरिकांच्या व्यथा ऐकत दारू दुकाने स्थलांतर करण्यास विरोध केला. त्यानंतर चालू असणारी दोन दुकानेही बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही त्यांनी सुरू केलेल्या चळवळीत सातत्य राहिले नाही. नगरपंचायतीकडे निवेदन दिल्याने नगरपंचायतीने तातडीने दारूबंदीचा निर्णय घेत स्वतः पुढाकार घेऊन हा निर्णय तडीस लावणार असल्याचे स्पष्ट केले. अवैध बांधकामे, विकासकामांचा दर्जा, नागरिकांच्या काही गैरसोयींबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवून ऐन निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना गाठता येईल का, असाही विरोधी गटाचा अभ्यास सुरू आहे.

निवडणुकीची चाहूल लागताच मलकापूर शहरातच मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम घेऊन त्यांच्यापर्यंत शहराच्या समस्या कानावर घालत भाजपच्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्नही यशस्वी केला आहे. या वेळी नगरपंचायतीची नगरपालिका करण्याची मागणीही श्री. भोसले यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. कर्जमाफी केल्याबद्दल श्री. भोसले यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सत्कार घेऊन येणाऱ्या निवडणुकीत तुमची मदत, वेळ आम्हाला पाहिजे, असे साकडे घातले असून, श्री. खोत यांनी ते मान्यही केले आहे. कार्यकर्त्यांची फळीही मजबूत करण्याचे भाजपची धडपड सुरू आहे. सध्या काँग्रेस-भाजप गटामध्ये शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. एकंदरीत काँग्रेस विकासकामांच्या मागे, तर भाजप निवडणुकीची तयारी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.

मलकापुरात राबवलेल्या नावीन्यपूर्ण योजना
२४ तास पाणीयोजना  सोलर सिटी
प्रियदर्शनी कन्यारत्न योजना 
प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान    हरित मलकापूर

Web Title: satara news congress bjp war