ठेकेदार पळाले; पण शिवतारेंना नाही कळले! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

सातारा -  यवतेश्‍वर ते कास पठारावरील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरविणारच किंवा यवतेश्‍वर घाट रस्त्यातील कोसळलेल्या दरडीचे काम 15 दिवसांत पूर्ण करू, अशा "राणाभीमदेवी' थाटात केलेल्या घोषणांवर पत्रकारांनी आज पालकमंत्री विजय शिवतारेंना छेडले खरे; पण शिवतारेंना या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. अखेर त्यांनी पत्रकार परिषदेतून अक्षरशः पळ काढला. 

सातारा -  यवतेश्‍वर ते कास पठारावरील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरविणारच किंवा यवतेश्‍वर घाट रस्त्यातील कोसळलेल्या दरडीचे काम 15 दिवसांत पूर्ण करू, अशा "राणाभीमदेवी' थाटात केलेल्या घोषणांवर पत्रकारांनी आज पालकमंत्री विजय शिवतारेंना छेडले खरे; पण शिवतारेंना या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. अखेर त्यांनी पत्रकार परिषदेतून अक्षरशः पळ काढला. 

कर्जमाफी योजनेची माहिती देण्यासाठी श्री. शिवतारे यांनी नियोजन भवनात पत्रकार परिषद घेतली. यवतेश्‍वर घाट रस्ता खचून पंधरा दिवस उलटले, तरीही त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नाही, यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थांची गैरसोय होत आहे, याची विचारणा "सकाळ'च्या प्रतिनिधींनी केली. त्यावर "दुर्घटनेच्या दिवशी सकाळी सात वाजता तत्काळ काम करण्याचे आदेश दिले होते. काम सुरू झाले आहे,' असे किरकोळीतील उत्तर श्री. शिवतारे यांनी दिले. मात्र, पुन्हा एकदा प्रतिनिधींनी "त्या रस्त्याचे काम ठेकेदाराने सोडले असून, योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोचत नाही,' असे सांगत वस्तुस्थिती समोर मांडली. त्यामुळे शिवतारे गडबडले. त्यांच्या स्वीय सहायकाने तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करून शिवतारे यांना दिला. त्या वेळी संतापलेल्या शिवतारे यांनी अधिकाऱ्यास खडसावले. ठेकेदाराला पळवून लावणाऱ्या इतरांवर गुन्हे दाखल करा, असे आदेशही त्यांनी दिले. येत्या पंधरा दिवसांत रस्ता व संरक्षक भिंतीचे काम सुरू केले जाईल, असे त्यांनी पत्रकारांना आश्‍वासन दिले. 

यवतेश्‍वर, कास पठारावरील बेकायदा बांधकामे पाडणार, बुलडोझर फिरविणार अशी घोषणा सातत्याने केली असूनही त्याबाबत प्रशासन दखल घेत नाही. न्यायालयाचा निकाल प्रशासनाच्या बाजूने लागला असतानाही कारवाई करण्याबाबतचा अर्ज (कॅव्हेट) दाखल केला गेला नाही, अशी वस्तुस्थिती पत्रकारांनी मांडली. त्यावर श्री. शिवतारे यांनी "नवीन बांधकामे झाली तर कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत,' असे सांगितले. त्यानंतर सध्या बांधकाम सुरू आहेत, ती तपासावीत, असे पुन्हा पत्रकारांनी सांगितले. "हा गंभीर प्रश्‍न आहे, तत्काळ पावले उचला,' असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर "पंधरा वर्षांतील मागील पालकमंत्र्यांनी केले नाही, ते मी करत आहे,' असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न शिवतारे यांनी केला; परंतु पत्रकारांनी त्याला जोडून प्रश्‍न विचारण्यास सुरवात केल्याने "ही पत्रकार परिषद केवळ कर्जमाफीची माहिती देण्यासाठी घेतली आहे,' असे सांगत त्यांनी तेथून काढता पाय घेतला. 

Web Title: satara news contractor