नोकरीचे आमिष दाखवत युवतीचे दागिने लांबवले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

सातारा - शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवत केसे (वारुंजी, ता. कऱ्हाड) येथील युवतीस जिल्हाधिकारी कार्यालयात आणून तिच्याजवळील पाच तोळ्यांचे सुमारे सव्वालाख रुपये किमतीच्या दागिन्यांसह भामट्यांनी पोबारा केला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अज्ञात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

सातारा - शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवत केसे (वारुंजी, ता. कऱ्हाड) येथील युवतीस जिल्हाधिकारी कार्यालयात आणून तिच्याजवळील पाच तोळ्यांचे सुमारे सव्वालाख रुपये किमतीच्या दागिन्यांसह भामट्यांनी पोबारा केला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अज्ञात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

प्राजक्ता मनोज पाटील (वय 25) असे पीडित युवतीचे नाव आहे. या युवतीला जिल्हाधिकारी कार्यालयात आणून सुमारे एक लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन भामट्यांनी पोबारा केला. याबाबत पोलिसांनी सांगितले, की प्राजक्ता पाटील हिचे शासकीय नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. प्रशांत मोरे व अन्य चार अनोळखी व्यक्तींनी तिला वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याचे सांगत शासकीय नोकरी लावण्याचे आश्‍वासन दिले. भामट्यांनी तिला "स्पर्धा परीक्षेतही चांगले गुण देण्यास सांगतो, अशी भलवणा करून तिला नोकरीची ऑर्डर तयार आहे. ती घेण्यासाठी सोमवारी (ता. 22) जिल्हाधिकारी कार्यालयात ये,' असे सांगितले. 

ती युवती जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यावर अधिकाऱ्यास भेटण्यासाठी नेण्याचे नाटक करून मध्येच थांबवत "अंगावरील दागिने काढून आमच्याकडे द्या. साहेबांसमोर दागिने घालून गेलेले त्यांना आवडणार नाही,' अशी बतावणी केली. तिच्याकडील एक लाख 20 हजार रुपयांचे पाच तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एका ठिकाणी तिला बसवत "साहेबांना भेटतो व तुम्हाला बोलवले, की आत या' असे तिला सांगितले. या भामट्यांनी नजर चुकवून तेथून पळ काढला. 

बराच वेळ झाला तरी हे का येत नाही हे पाहण्यासाठी युवती जिल्हाधिकारी कार्यालयात गेली असता त्यामधील कोणीही तिथे नव्हते. त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला असता मोबाईलही स्वीच ऑफ लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्राजक्ता पाटील हिने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Web Title: satara news crime gold theft