बांधकाम व्यावसायिकाच्या दुकानातून सहा लाख लंपास 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

मलकापूर - पुणे-बंगळूर महामार्गालगतच्या कोल्हापूर नाका येथील पंजाब हॉटेलनजीक असलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय फोडून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख 90 हजार रुपयांची रोकड लंपास केली. नजीकच असलेल्या बॅंकेतही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. काल (ता. 30) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. 

मलकापूर - पुणे-बंगळूर महामार्गालगतच्या कोल्हापूर नाका येथील पंजाब हॉटेलनजीक असलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय फोडून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख 90 हजार रुपयांची रोकड लंपास केली. नजीकच असलेल्या बॅंकेतही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. काल (ता. 30) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय देसाई यांचे डी. एस. देसाई असोसिएशन कन्स्ट्रक्‍शन नावाचे कोल्हापूर नाक्‍यावर कार्यालय आहे. कामगारांचे पगार व बांधकाम साहित्याचे पैसे भागवण्यासाठी श्री. देसाई यांनी पाच लाख 90 हजार रुपयांची रक्कम कार्यालयात ठेवली होती. कॅशिअर ही रक्कम कार्यालयात ड्रॉवरमध्ये ठेवून सात वाजता घरी गेले. तशी माहितीही देसाई यांना दिली होती. त्यानंतर देसाई हे नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजता कार्यालय बंद करून घरी गेले. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कामगार नेहमीप्रमाणे कार्यालय उघडण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना कार्यालयाच्या शटरचे कुलूप उचकटल्याचे दिसले. त्यांनी शटर उघडून पाहिले असता आतील लाकडी दरवाजाचेही कुलूप उचकटल्याचे दिसले. ऑफिसमध्ये पाहिल्यानंतर ड्रॉवरमधील पाच लाख 90 हजार रुपयांची रोकड गेल्याचेही निदर्शनास आले. 

या कार्यालयानजीकच असणाऱ्या इंडस इंड मार्केटिंग फायनान्स सर्व्हिसेस प्रा. लि. बॅंकेतही चोरीचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. बॅंकेचेही कुलूप उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बॅंकेतील सर्व साहित्य उचकटले. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. 

नेहमी वर्दळ असणाऱ्या महामार्गालगत चोरीची घटना घडल्याने मलकापूर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक शिवराम खाडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले होते. मात्र, श्‍वान बिल्डिंग परिसरातच घुटमळले. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. याबाबत दत्तात्रय देसाई (रा. मोरया कॉम्लेक्‍स, आगाशिवनगर) यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत. 

Web Title: satara news crime malkapur news