पोलिस ठाण्यातून गुंडांचा वावर झाला हद्दपार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

बी. आर. पाटलांची एकंदर कारकीर्द सर्वच अधिकाऱ्यांना ठरली प्रेरणादायी 

बी. आर. पाटलांची एकंदर कारकीर्द सर्वच अधिकाऱ्यांना ठरली प्रेरणादायी 
सातारा - शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी काल पदभार सोडला. गेल्या दोन वर्षांत त्यांनी शहरातील गुन्हेगारीचा काटेकोर अभ्यास करून उपाययोजना आखल्या. त्यातून युवती व महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण झाले. गुन्ह्यांचे खास करून मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांत घट झाली. सर्वसामान्यांना त्यांची सहज भेट व्हायची. त्यामुळे दलाल व गुंडांचा वावर पोलिस ठाण्यातून हद्दपार झाला होता. मराठा किंवा बहुजन क्रांती मोर्चा कोणताही बाका प्रसंग असो, त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे तो सुलभरितीने पार पडला. त्यांची एकंदर कारकीर्द सर्वच अधिकाऱ्यांना प्रेरणादायी अशी होती. येणाऱ्या अधिकाऱ्यांना शहराची ही शांतता टिकवणे व सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे पोलिस ठाणे निर्माण करण्याचे आव्हान आहे.

निरीक्षक बी. आर. पाटील यांनी या आधीही शहरात काम केलेले होते. त्यामुळे त्यांना शहराची, त्यातील माणसांची चांगली जाण होती. ते येण्यापूर्वी सातारा शहराची अवस्था फारशी समाधानकारक नव्हती. मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध उपाययोजना वेगाने राबविण्यास सुरवात केली. त्यांचा पहिला उपक्रम म्हणजे प्रत्येक नागरिकाला मुक्त प्रवेश. कितीही वेळ लागला तरी, प्रत्येक माणसाचे म्हणणे ते शांतपणे ऐकूण घ्यायचे. कायद्याबरोबर त्याला पुढील जीवनात आवश्‍यक असलेला योग्य सल्ला त्यांच्याकडून दिला जायचा. त्यामुळे पोलिस ठाण्यात आलेला नागरिक समाधानाने जात होता. जास्त कायदेशीर बोलणाऱ्यांसाठी त्यांच्या टेबलावरची कायद्याची पुस्तकेही तयार असायची. त्यामुळे व्यक्तीला योग्य न्याय मिळत होता. 

यापूर्वीच्या काही अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात ठराविक लोकांचा वावर पोलिस ठाण्यात असायचा.  त्या भागातली घटना असली की तो अगोदर हजर व्हायचा. मात्र, थेट पीडिताशीच संपर्काचे धोरण बी. आर. यांनी अवलंबले होते. त्यामुळे पोलिस ठाण्यातील कामासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नागरिकांना भासत नव्हती. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची परंपरा त्यांनी या वर्षीही काटेकोटरपणे अंमलात आणली. दरवर्षी भांडणांची पार्श्‍वभूमी असलेला गणेशोत्सव अत्यंत शांततेत पार पडला. विनापरवाना एकही खासगी स्पिकर साताऱ्यात वाजून दिला नाही. रात्री दहानंतर रस्त्यावर वाढदिवस साजरा करणारे, फटाके फोडणारे, मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरची वाहने चालविणाऱ्यांना त्यांनी चाप लावला. 

विनापरवाना फ्लेक्‍स लागण्याचे प्रमाण त्यांच्या ठोस धोरणामुळे अत्यंत कमी आले. विनापरवाना लावलेला फ्लेक्‍स कोणाचाही असो त्यांनी गुन्हे दाखल केले. शहर पोलिस ठण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे एकंदर प्रमाणही शंभरनी कमी आले. मंगळसूत्र चोरीच्या घटनांनी ते येण्यापूर्वी शहरातील महिला अत्यंत त्रस्त झाल्या होत्या. मात्र, हे गुन्हे कमी करण्यात त्यांना यश आले.

जिल्ह्यात आजवरचा सर्वांत मोठा मोर्चा ठरलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे नियोजनही अत्यंत उत्कृष्टपणे केले. त्यानंतर बहुजन क्रांती मोर्चाही योग्य पद्धतीने पार पाडला गेला. निर्भया पथकाची शहरातील कामगिरी अत्यंत चांगली झाली. त्यामुळे शाळा व महाविद्यालय परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण झाले. प्राध्यापकपदाचा अनुभव असल्यामुळे त्यांच्याकडे उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य होते. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांवर त्यांचे गारूड होते. कोणत्याही घटनेच्या ठिकाणी पोलिस पोचण्याचा कालावधी त्यांनी चार ते पाच मिनिटांवर आणला होता. शहराचा सुधारित वाहतूक आराखडा तयार करून शहराच्या एकंदर वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे असे काम त्यांनी केले आहे.

सर्वसामान्यांसाठी २४ तपास उपलब्ध 
निवडणूक काळात २२ जणांना त्यांनी तात्पुरते हद्दपार केले. पाच गुंड दोन वर्षांसाठी हद्दपार झाले. सर्वसामान्य माणसाचे पोलिस ठाण्यातील काम एकाच फेरीत व्हावे, असा त्यांचा कटाक्ष होता. सर्वसामान्यांसाठी २४ तपास उपलब्ध असणाऱ्या या अधिकाऱ्याने खरोखर प्रेरणादायी काम केले आहे. सर्वसामान्य सातारकर त्याबद्दल आदर व्यक्त करत आहेत.

Web Title: satara news criminal out in police station